Amruta Raorane On Weight Gain: वाढलेले वजन ही अनेकांसाठी मोठी समस्या आहे. अगदी अनेक कलाकारांनाही याचा सामना करावा लागतो. अनेक कलाकार याबद्दल खुलेपणाने बोलतात. आता अभिनेत्री अमृता रावराणेनेदेखील यावर वक्तव्य केले आहे. सध्या अमृता स्टार प्रवाहवर प्रदर्शित होत असलेल्या पाठराखीण या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत काम करत आहे. अंबिका सूर्यवंशी असे तिच्या भूमिकेचे नाव आहे.

अमृता रावराणेने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले गेले की, मालिकांमध्ये काम करताना तुला असं वाटलं का की, आपल्या दिसण्यात किंवा वागण्या-बोलण्यात काही बदल केले पाहिजेत?

अमृता रावराणेने केले भाषेवर काम

त्यावर अमृता म्हणाली, “हो. माझ्यासाठी सगळ्यात पहिलं आव्हान हेच होतं की, जेव्हा मी गावावरून मुंबईत आले, तेव्हा मी पूर्ण मालवणी होते. मालवणीमध्ये बोलायचे. बोलताना तो एक सूर असायचा. लोक सहज ओळखायचे. ते मला म्हणायचे की, तू कोकणातली आहेस का? मी माझ्या भाषेवर खूप काम केलं. खूप प्रयत्न केले. अभ्यास केला. त्यानंतर लोक मला विचारायले लागले की, तू पुण्याची आहेस का? तू ब्राह्मण आहेस का? तर, मी त्यांना सांगायचे की, नाही मी कोकणातली आहे आणि सकपाळ आहे. त्यावर लोक मला म्हणायचे की, तू कोकणातली वाटत नाहीस. तो माझ्या अभ्यासाचा भाग होता की, मला शुद्ध स्पष्ट आणि टोनविरहित बोलायचं आहे; पण तो खूप मोठा स्ट्रगल होता. अजूनही मला कोणी कोकणी मालवणी माणूस भेटला, तर मी त्या सुरात बोलते.”

वाढलेल्या वजनाबद्दल अमृता म्हणाली….

वाढलेल्या वजनाबद्दल अमृता म्हणाली, “शारीरिक म्हणायचं, तर अगदी आतापर्यंत मला असं कधीच वाटलं नव्हतं की, मी माझ्यावरती काम करायला पाहिजे; पण आता गेली काही वर्षं पाहता, म्हणजे डिलिव्हरीनंतर तसं वाटलं. मी यासाठी कोणाला दोष देत नाही. तो माझा दोष आहे की, मी वर्कआऊट केलं नाही. मी पूर्वीसारखी मेंटेन राहीन यासाठी मी प्रयत्न केले नाहीत. त्यानंतर मी खूप प्रयत्न करते; पण वजन कमी होत नाही. मी त्या कोशात गेले होते की, मी कशी दिसत आहे. पण, माझा नवरा प्रणव मला म्हणाला की, आता तू आहेस ती आहेस. ते तू स्वीकार. तू बारीक होत नाहीस, तर रडत बसण्यात काही अर्थ नाही. तुझ्यात आत्मविश्वास असणं महत्त्वाचं आहे. तू कशी दिसतेस यापेक्षा तू कशी सामोरी जातेस हे जास्त महत्त्वाचे आहे.”

वाढलेल्या वजनाचं तुला कधी टेन्शन येतं का? त्यावर अमृता म्हणाली की, हो, त्याचा मानसिकदृष्ट्या दबाव येतो. लोक म्हणतात की, अमृता तू काय झाली आहेस तू? तर माझं असं असतं की, तुम्ही मला लहानपणी मी बारीक असताना बघितलं होतं. आता मी मोठी झाले आहे. आता मी बाई आहे. आता मी अशी उत्तरं देते आणि टाळते. पण, खरंच मला माझ्यावरती काम करायला आवडेल.”

अभिनय क्षेत्रात काम करीत असताना बाळ झाल्यानंतर काम मिळेल का, तसेच त्यानंतर वजन वाढतं, त्याचं टेन्शन आलं होतं का, या प्रश्नाचे उत्तर देताना अमृता म्हणाली, “मला प्रेग्नन्सीचं टेन्शन आलं नव्हतं आणि तेव्हा माहीत नव्हतं की, वजन वाढेल. कारण- ते नियंत्रणात होतं आणि व्यवस्थित होतं. कधीच मला वजनाचं किंवा पोट दिसतंय, माझे हात मोठे दिसतात. स्क्रीनवर मी बेढब दिसते, असं मला कधीच वाटलं नव्हतं. प्रत्येक भूमिकेत आपला लूक वेगळा पाहिजे आणि मुळात आपला अभिनय वेगळा पाहिजे. अभिनय वेगळा असेल, तर आपण पुढे जात राहतो. आपण कसे दिसतोय यावर कोणी बोलत नाही. मी बारीक दिसणं महत्त्वाचं आहे की मी चांगलं काम करणं महत्त्वाचं आहे, असा मी विचार केला.”