Swati Anand Unmarried Reason: ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘कुमकुम भाग्य’ सारख्या सुपरहिट मालिकांमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री स्वाती आनंदने ६३ व्या वर्षी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठे गुपित उघड केले आहे. तिने अद्याप लग्न केलेले नाही आणि भविष्यातही तिचा असा कोणताही विचार नाही. पण गेल्या २५ वर्षांपासून एका रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली स्वातीने स्वतः दिली आहे. स्वाती आनंदला लग्न का करायचं नाही आणि तिने आयुष्यभर एकटं राहण्याचा निर्णय का घेतला, याचं कारण स्वतः सांगितलं आहे.

‘टेली मसाला’ला दिलेल्या मुलाखतीत स्वाती आनंदने सांगितलं की, ती अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. जवळपास २४-२५ वर्षे झाली आहेत, पण ती तिचं वैयक्तिक आयुष्य खूप खासगी ठेवते. मात्र, तिच्या मालिकेच्या सेटवर सर्वांनाच तिच्या या नात्याबद्दल माहिती आहे.

स्वाती आनंदने लग्न का केलं नाही?

लग्न न करण्याबद्दल स्वाती आनंद म्हणाली, “मला कधी लग्न करावसं वाटलंच नाही. मी लहान असतानाही म्हणायचे की मी एकटीच राहीन. माझ्या आईला नेहमी वाटायचं की, मला एकच मुलगी आहे, त्यामुळे तिचं लग्न मी खूप थाटामाटात करेन. पण हळूहळू मी जशी मोठी होऊ लागले, तसतसे माझे विचार लोकांना समजू लागले.”

आपल्या देशात मुलींना स्वातंत्र्य नाही – स्वाती आनंद

ती पुढे म्हणाली, “काहीही झालं तरी, आपल्या देशात, समाजात मुलींना तितके स्वातंत्र्य नाही. मला माझ्या स्वतःच्या घरात खूप स्वातंत्र्य मिळाले आहे. पण मला नेहमी एकच प्रश्न पडायचा की, लग्न करून मी ज्या घरी जाईन, तिथे मला इतकं स्वातंत्र्य मिळेल का? हा एक प्रश्न नेहमी माझ्या मनात राहिला आणि मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.”

नात्यांमध्ये दुरावा नको, प्रेम जपायचं होतं – स्वाती आनंद

आपल्याला स्वतःच्या घरात जे प्रेम आणि स्वातंत्र्य मिळालं, ते दुसऱ्याच्या घरात मिळेल की नाही, याच विचाराने स्वाती आनंद लग्नापासून दूर राहिली. “मी जर माझे १००% दिले, तर समोरची व्यक्ती किमान ५०% तरी देईल, अशी अपेक्षा आपण ठेवतोच. आपण शेवटी माणूस आहोत, त्यामुळे कोणाकडूनच अपेक्षा न ठेवणं शक्यच नाही. पण सध्याच्या आयुष्यात नाती ज्या प्रकारे गुंतागुंतीची होत चालली आहेत, आपल्याभोवती सोयी-सुविधा तर वाढत आहेत, पण नात्यांमध्ये दुरावा येऊ लागला आहे. मला आयुष्यात कशाची तरी कमतरता जाणवावी, तेच मला नको होतं. कारण मला माझ्या घरात खूप प्रेम मिळालं. त्यामुळे मला तितकंच प्रेम मिळालं नाही तर मी काय करेन, याच विचारात मी राहिले. माझ्याकडे जे प्रेम आहे, तेच मला जपून ठेवायचे होते. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी होते,” असं स्वाती आनंदने नमूद केलं.

सून लेकीसारखी आहे, या फक्त बोलण्याच्या गोष्टी – स्वाती आनंद

सासरचे लोक सून कितीही लेकीसारखी आहे असं म्हणत असले, तरी प्रत्यक्षात तसं नसतं, असं स्पष्ट मत स्वाती आनंदने मांडलं. तसेच ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या शूटिंगच्या वेळीही ती शिफ्टच्या मधल्या वेळात घरी येऊन आई-वडिलांसाठी स्वयंपाक करून परत जायची, असं तिने नमूद केलं. स्वाती आनंद म्हणाली, “माझे आई-वडील माझी परिस्थिती समजून घ्यायचे, पण कदाचित दुसरे कुटुंब हे समजून घेऊ शकले नसते. सासरचे लोक म्हणतात ना की, सून आता आमची मुलगी आहे, पण या फक्त बोलण्याच्या गोष्टी असतात. प्रत्यक्षात तसं होत नाही, कारण मी माझ्या अवतीभवती जे काही पाहते, त्यात मला तरी असं कुठेही दिसलेलं नाही.”