Tarini upcoming twist: तारिणी या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतात. भ्रष्टाचार, अन्नपदार्थांतील भेसळ, मॉर्फ केले जाणारे व्हिडीओ, मुलींवरील अत्याचार यांसारख्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल या मालिकेत भाष्य केले जाते.

मालिकेतील तारिणी व केदार हे स्पेशल क्राईम युनिटचा भाग आहेत. ते व त्यांची टीम विविध गुन्ह्यांच्या शोध लावते, गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी ते प्रयत्न करतात. त्यामुळे तारिणी या मालिकेत कौटुंबिक गोष्टींबरोबर अॅक्शन सीन्स पाहायला मिळतात, हेरगिरी पाहायला मिळते. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे.

तारिणी मालिकेत ट्विस्ट

ऑफिसर असण्याबरोबरच तारिणी व केदार एकमेकांचे खूप चांगले मित्रही आहेत. केदारचे तारिणीवर प्रेम आहे; पण तारिणी फक्त त्याच्याकडे एक चांगला मित्र म्हणून पाहते. त्यांनी एका केसच्या शोधासाठी लग्न करण्याचे नाटक केले होते. परंतु, घरच्यांच्या आग्रहामुळे त्यांना खरेच लग्न करावे लागले. तरीही तारिणीने केदारला सांगितले आहे की, जेव्हा तुला लग्नाच्या बंधनातून मुक्त व्हायचे असेल, तेव्हा तू या नात्यातून बाहेर पडू शकतोस. कारण- तिला वाटते की, केदारच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी मुलगी आहे.

काही दिवसांपूर्वी तारिणीने त्यांच्या टीममध्ये हरप्रीत चड्ढा नावाचा ऑफिसर टीममध्ये सामील होणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी तिने त्या ऑफिसरचे कौतुकही केले होते. ते ऐकल्यानंतर केदारला नवीन ऑफिसरबद्दल ईर्षा वाटली होती. जर तारिणी नवीन ऑफिसरच्या प्रेमात पडली तर काय? असेही त्याला वाटले होते; पण आता मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर तारिणी या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तारिणीचे वरिष्ठ अधिकारी सांगतात, “टीम तारिणी, आज आपल्या टीममध्ये एक नवीन मेंबर जॉईन होणार आहे. ती फिल्डवर उत्तम काम करते. त्याबरोबरच ती अतिशय चतुर आणि साहसी आहे. ऑफिसर हरप्रीत चड्ढा…” त्यानंतर ऑफिसरची एन्ट्री होते. हेल्मेट काढल्यानंतर ऑफिसरचा चेहरा दिसतो. हरप्रीत चड्ढा मुलगा नसून मुलगी आहे. तिला पाहताच केदारच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. तो आनंदाने म्हणतो, “रेवा…”, ती मुलगीदेखील केदारला ओळखते. ती त्याला केडी? असे म्हणते. त्यानंतर दोघे आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटते. तेव्हा तारिणी म्हणते, “रेवा? अरे, वाह.” हे म्हणताना तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘ऑफिसर हरप्रीत चड्ढाची होणार टीम तारिणीमध्ये धमाकेदार एन्ट्री’, अशी कॅप्शन दिली आहे. त्यावर प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसेच, अनेकांनी हा ट्विस्ट पाहायला मजा येणार, असेही लिहिले आहे.

रेवा ऊर्फ हरप्रीत चड्ढा या भूमिकेत अभिनेत्री पायल जाधव दिसत आहे. पायल जाधव याआधी अबीर गुलाल या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसली होती. या मालिकेतून तिला खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.

दरम्यान, आता तारिणी मालिकेत नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.