अभिनेत्री विदिशा म्हसकर सध्या ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिनेत्रीने तेजा ही भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते. आता मात्र अभिनेत्री तिच्या भूमिकेमुळे नाही तर तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

विदिशाने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या पहिल्या रिलेशनशिपबद्दल सांगितले. ती म्हणाली, “महाडमध्ये असताना माझं एक रिलेशनशिप होतं. त्या रिलेशनशिपमध्ये असताना त्या व्यक्तीबरोबर मी बाहेर फिरायला गेले होते. गावामध्ये जेव्हा एक मुलगा आणि मुलगी एकत्र फिरतात, तेव्हा त्याला एक वेगळं वळण दिलं जातं.”

“आज मी २९ वर्षांची…”

“मी तेव्हा वयाने लहानही होते. तेव्हा मोठ्या माणसांनी ज्या पद्धतीने गोष्टी हाताळल्या, ते चुकीचं होतं. मोठ्या माणसांनी या गोष्टी अशा हाताळू नयेत; मी लहान होते पण ते तर मोठे होते. मोठ्यांना माहीत पाहिजे की हे वय कसं आहे किंवा या वयात काय-काय होऊ शकतं.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “आज मी २९ वर्षांची आहे. आता मी मागे वळून त्या गोष्टींकडे पाहते, तेव्हा मला असं वाटतं की जर मला असं कोणी दिसलं असतं तर मी वेगळ्या पद्धतीने गोष्टी हाताळल्या असत्या. तुम्ही जे वागताय त्याचा १९-२० वर्षांच्या मुलीच्या मेंदूवर आयुष्यभरासाठी परिणाम होऊ शकतो. याचा विचार न करता, त्या संवेदनशील गोष्टीला हवे तसे हाताळतात ते मला पटत नाही.”

“आम्हाला ज्यांनी बघितलं त्यांनी ते आमच्या घरी अकांडतांडव होईल अशा विचित्र पद्धतीने सांगितलं. ते करण्याची काहीच गरज नव्हती, त्यातून त्यांना काहीच मिळणार नव्हतं, फक्त माझ्या घरी भांडणेच झाली असती; तर मला असा विचार आला होता की त्यांनी तसे का केले? मी जर इतकी लहान असून मला जर हे कळत असेल तर ते त्यांनी हे का केले मला कळले नाही. पण, देवाने त्या माणसाला शिक्षा दिली.”

पुढे ती असेही म्हणाली, “त्यानंतर आमच्या घरात खूप तणाव होता. त्यादरम्यान मी एक नाटक करत होते. ‘संगीत घागरे के पिछे’ असे त्याचे नाव होते. त्या नाटकाची चर्चा झाली. त्या नाटकातील एक प्रसंग वडील आणि मुलीच्या नात्याबद्दल होता. त्यावेळी माझी परिस्थिती आणि त्या प्रसंगात खूप साध्यर्म्य होते. कारण- मी आणि बाबा थोडे दिवस बोलत नव्हतो. पण, त्या नाटकाच्या प्रयोगासाठी बाबा आले होते.

त्या प्रसंगाला त्याआधी खदखदून रडले नव्हते, त्या दिवशी रडले. त्या प्रयोगाला मी बोलायला सुरुवात केली आणि प्रेक्षकांमध्ये मला बाबा दिसले. तो प्रसंग मी त्यांच्याकडे बघून बोलले होते. त्यादिवशी माझ्या कुटुंबाने मी इतके दिवस काय काम करते हे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यांत मला दिसलं की मी जे करतेय ते मी बरोबर करत आहे; त्यांना आनंद झाला होता”, असे म्हणत विदिशाने रिलेशनशिपबद्दल घरी समजल्यानंतर काय घडले होते याबद्दल खुलासा केला.