Actress Sanchita Ugale Suicide Case Police Statement and Father Reaction: विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटात ताराबाईंची भूमिका साकारणारी २२ वर्षांची प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री संचिता उगले हिने रविवारी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या अत्यंत धक्कादायक घटनेनंतर आता आचोले पोलीस ठाण्याचे एपीआय विनोद बाग यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. संचिताच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
संचिता सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. अचानक तिच्या निधनाची बातमी आल्याने चाहत्यांना व कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. संचिताने अवघ्या २२ व्या वर्षी असं धक्कादायक पाऊल का उचललं, त्याचा तपास पोलीस करत आहेत.
आचोले पोलीस ठाण्याचे एपीआय विनोद बाग एएनआयशी बोलताना म्हणाले, “आचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घटनेची नोंद करण्यात आली आहे. २२ वर्षांची संचिता मच्छिंद्र उगले हिने काही कारणास्तव आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय ते तपासात कळेल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. आतापर्यंत घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. तसेच, आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत कोणाविरुद्धही कोणतीच तक्रार नसल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे.”
संचिता उगले आत्महत्या प्रकरणात पोलीस म्हणाले…
संचिता उगले तिचे आई-वडील आणि १५ वर्षांच्या लहान बहिणीबरोबर राहत होती. रविवारी संध्याकाळी ५:३० च्या सुमारास तिची लहान बहीण अंजली काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. घरात कोणीही नसताना संचिताने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तिला पाहिल्यानंतर इतरांच्या मदतीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
संचिता उगले अवघ्या २२ वर्षांची होती. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते. तिने ‘छावा’ सिनेमात ताराबाईंची भूमिका केली होती. तसेच ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘वागले की दुनिया’ या मालिकांमध्येही काम केलं होतं. संचिताच्या आत्महत्येच्या बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या निधनाबद्दल टीव्ही इंडस्ट्रीतूनही शोक व्यक्त केला जात आहे.
