‘येड लागलं प्रेमाचं’, ‘स्वाभिमान’, ‘साजणा’ या मालिकांमुळे अभिनेत्री पूजा बिरारी घराघरांत लोकप्रिय झाली. आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने कायमच चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. पूजाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात सोहम बांदेकरशी लग्नगाठ बांधली. सध्या सोहम-पूजाचा सुखाने संसार सुरू आहे. याचदरम्यान अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती उच्च शिक्षणासाठी लंडनला जाणार असल्याचा खुलासा केला आहे.

पूजा बिरारी ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधताना म्हणाली, “बारावीनंतर मी माझ्या करिअरबद्दल फार संभ्रमात होते. बाबांचं म्हणणं होतं की, तू आर्किटेक्चर कर…तेव्हा मग माझं सेफर साइड BCS आणि आर्किटेक्चर अशा दोन्ही विषयांचं ॲडमिशन झालं होतं. इंजिनिअरिंग वगैरेचा विचार करायचा आहे का? असंही मला दादाने विचारलं होतं. एकंदर मी त्या संपूर्ण प्रक्रियेत खूप गोंधळलेली होते. एकेदिवशी तर मी सकाळपासून आर्किटेक्चरच्या प्रोसेसमध्ये होते आणि त्याचदिवशी मग संध्याकाळी मला फर्ग्युसन महाविद्यालयातून BCS चं ॲडमिशन कन्फर्म झालंय हे सांगण्यासाठी फोन आला होता. मलाही तिथे शिक्षण पूर्ण करायचं होतं. मग, दादाने माझं आर्किटेक्चरचं ॲडमिशन स्वत:च कॅन्सल केलं. कारण, त्यावेळी दादाने ओळखलं होतं की, हिला काही आर्किटेक्चरमध्ये रस नाहीये. शेवटी माझं फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं मग मी सुद्धा खूश झाले.”

पूजा पुढे म्हणाली, “माझं कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि मी त्याचवर्षी उच्च शिक्षणासाठी लंडनला जाणार होते. मला मास्टर्स करायचं होतं…सगळ्या गोष्टी सेट होत्या, जॉब होता आणि याचदरम्यान, मला एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर आली. मी आई-बाबांशी मग बोलले, फक्त तुझ्या सोयीने तू मास्टर्स पूर्ण कर असा सल्ला त्यांनी दिला होता. पण, मुंबईवरून ऑडिशन वगैरे आल्यावर मलाही मनापासून जायचं होतं. तेव्हा सुद्धा दादा माझ्याबरोबर होता.”

“दादा आणि मला आम्हा दोघांनाही मुंबईमधलं काहीच माहिती नव्हतं. आम्ही ओबेरॉयच्या इथे थांबलो होतो आणि ते विश्वजीत जोशी सर होते…त्यांना आम्ही इतकं छळलंय. त्यांना सतत फोन केले. साधारण अडीच तास आम्ही गोल-गोल फिरत होतो. एका पॉइंटला असंही झालं होतं की, दादा आपण घरी जाऊयात. पण, तेव्हाच माझी मैत्रीण भेटली आणि आम्ही ऑडिशन जिथे होती तिथे पोहोचलो. माझ्या प्रत्येक
ऑडिशनला दादा होताच.” असं पूजाने सांगितलं.