Pooja Birari Talks About Mother In Law Suchitra Bandekar : पूजा बिरारी मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत काम करत आहे. पूजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिच्या खासगी व दैनंदिन जीवनातील घडामोडींबद्दल सांगत असते.
पूजा बिरारी काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे विशेष चर्चेत होती. अभिनेत्रीनं लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाशी सोहम बांदेकरशी लग्न केलं. दोघांनी मित्र-मैत्रिणी व कुटुंबीयांच्या साक्षीनं थाटामाटात लग्न केलं. अभिनयाचा कोणताही वारसा नसलेल्या पूजाचं अभिनय क्षेत्रात मोठं नाव असलेल्या कुटुंबात लग्न झालं आहे.
पूजा व सोहम यांचा प्रेमविवाह झाला आहे. दोघे लग्नाआधी एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर दोघांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे. यावेळी पूजानं पहिल्यांदा तिच्या सासू सुचित्रा बांदेकर यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. यावेळी तिनं सासूबाईंना पाहिल्यानंतर तिला घाम फुटला होता, असं ती म्हणाली आहे. हा किस्सा नेमका काय आहे याबद्दल जाणून घेऊयात…
सुचित्रा बांदेकर यांना भेटल्यानंतर पूजाला फुटलेला घाम
पूजा मुलाखतीत सुचित्रा यांच्याबद्दल म्हणाली, “मला आधी वाटायचं की, सोहम आधी ठाण्यातच राहतो. कारण- तो दोनदा-तीनदा मला ठाण्यातच भेटला होता. मी त्याच्या घराजवळ आल्यानंतर तेव्हा तो हाफ पँटमध्ये होता. मी म्हटलं हा असा का आलाय भेटायला. तेव्हा तो बोलला की, चल वर आजीला भेटवतो. माझं असं झालं की, आज मी घरी यायचंय? अजिबात नाही. मी येतच नसते. मी घरी गेल्यानंतर तिथे आई होत्या. त्या म्हणाल्या की, मी निघतच होते. म्हटलं तुला भेटूनच जाईन. म्हणून मी थांबले होते. मला तेव्हा घाम फुटला होता तिथे.”
सोहम त्यावर पुढे म्हणाला, “घरी न जाण्याचं कारण काय असायचं, तर मी बरी नाही दिसतेय. हे काय कारण झालं का”. पूजा पुढे म्हणाली, “तेव्हा माझा चेहरा बघून त्यांना कळलं असेल की, मी घाबरले आहे. एखाद्या मुलीसाठी मुलाच्या घरी जाऊन त्याच्या आईला भेटणं ही मोठी गोष्ट असते. पण, तेव्हा त्या बोलल्या माझ्याशी छान आणि मग गेल्या.”
