Shailesh Datar on His wife: शैलेश दातार यांनी आजवर विविध मालिका, नाटक, चित्रपट यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. ‘चार दिवस सासूचे’, ‘पेशवा बाजीराव’, ‘डोबिंवली रिटर्न’, ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘मेघ दाटले’, ‘देवों के देव महादेव’, अशा अनेक मालिका, चित्रपटांत ते दिसले आहेत.
नुकतेच ते नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘तस्करी: द स्मगलर्स’ या वेब सीरिजमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. त्यांच्या भूमिकेचे कौतुक होताना दिसत आहे.
या भूमिकेबरोबरच शैलेश दातार यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना त्यांच्या पत्नीबद्दल विचारले. त्यावर शैलेश दातार म्हणाले, “ती माझी मैत्रीण आहे. या पलीकडे मी तिचं वर्णन करू शकत नाही. खऱ्या अर्थाने मैत्रीण असते ना ती तशी आहे. नवरा बायकोने मित्र मैत्रीण असलं पाहिजे.”
“नवरा-बायको हे नातं…”
पुढे ते म्हणाले, “नवरा-बायको हे नातं आमच्यात फारसं कधी नव्हतंच, आधीही नव्हतं आणि नंतरही नाही. आता इतक्या वर्षांच्या प्रवासानंतरही नाही. कारण- आम्ही रोज भांडतो,आमचे रोज मतभेद होतात. पण, जे एकत्र असणं आहे, ते अफलातून आहे. त्याला तोड नाही. ती कायमच माझ्यासाठी असते. कुठल्याही महत्वाच्या निर्णयामध्ये मी साथ मागण्याआधी तिची साथ मला असते.”
“नाटकाच्या विषयाबद्दल असेल किंवा आता मी एक प्रायोगिक नाटक करतोय. त्या नाटकाबद्दल असो. योगायोगाने तिने म्हणावं की तुला असं नाटक मिळावं आणि मला ते मिळालेलं आहे. असं ते घडतं. आम्ही खूप चांगले मित्र आहोत.
“आम्ही एका शाळेत होतो. पण मित्र नव्हतो. एका वर्गात होतो. त्यानंतर आम्ही एका कॉलेजमध्ये होतो. पण, आता आमचं नातं मुरलेलं आहे. ती माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे. सतत आपल्यामागे हात असतो, ती तशी कायम असते आणि तिच्या शिवाय मी कुठला निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही खूप धमाल करतो. गप्पा मारतो, भांडतो”, असे म्हणत पत्नीबरोबर मैत्री अधिक आहे. ती कायम कोणत्याही निर्णयात बरोबर असते, असे त्यांनी सांगितले.
याच मुलाखतीत त्यांनी त्याच्या करिअरबद्दल, तसेच आशा भोसले यांची भेट कशी झाली होती, नाटक, याबद्दलही वक्तव्य केले. तसेच, बिझनेस, नोकरी हे सर्व करून पुन्हा ते नाटकाकडे कसे वळले, याबद्दल सांगितले. तसेच, सिनेसृष्टीतील मित्रांबद्दलही ते बोलले. तसेच, सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांनी सुरुवातीला कसे सांभाळून घेतले, याबद्दलही सांगितले.

