Prabhu Shelke on Raqesh Bapat: प्रभू शेळके नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून एलिमिनेट झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रभूने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याची काही स्पर्धकांबरोबर भांडणेदेखील झाली. तर काही स्पर्धकांबरोबर मैत्रीही झाली. पुढे तो काटा गँगमध्ये सहभागी झाला.
काटा गँगमध्ये प्रभूसह राकेश बापट, तन्वी कोलते, दिपाली सय्यद आणि नंतर रेवा हे स्पर्धक होते. प्रभू एलिमिनेट झाल्यानंतर आता चार स्पर्धक काटा गँगमध्ये राहिले आहेत. बिग बॉसच्या घरात असताना प्रभू व तन्वीचे बॉण्डिंग सर्वांना आवडले. त्यांच्या बहीण-भावाच्या नात्याची चर्चा झाली. तसेच, त्याचे राकेश बापटबरोबर देखील मैत्रीचे उत्तम नाते असल्याचे पाहायला मिळाले.
आता एका मुलाखतीत प्रभू शेळकेने राकेश बापटबद्दल वक्तव्य केले आहे. राकेशची कोणती गोष्ट आवडली नाही, याबद्दल त्याने सांगितले आहे. तो नेमकं काय म्हणाला, हे जाणून घेऊ…
प्रभू शेळके राकेश बापटबद्दल म्हणाला…
प्रभू शेळकेने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रभू काटा गँगमधील स्पर्धकांबद्दल म्हणाला, “राकेशदादाबरोबर काही वाद नव्हते. दिपाईताई सुद्धा मला पाठिंबा देत होत्या. माझ्यासाठी त्या खेळायच्या. माझ्या आरोग्याच्या समस्या होत्या. तर काळजी घ्यायच्या. तन्वीदेखील काळजी घ्यायची.”
पुढे तो म्हणाला, “राकेश दादा मला चांगले वाटायचे. पण, शेवटच्या आठवड्यात त्यांनी भाऊंना (रितेश देशमुख)सांगितलं की प्रभू मला सगळ्यात कमजोर स्पर्धक वाटतोय. त्याला नॉमिनेट करावं, असं मला वाटलं होतं. पण, तो काटा गँगचा असल्यामुळे मी त्याला नॉमिनेट केले नाही. त्यांचे ते बोलणे ऐकून मला दु:ख झालं.”
प्रभू पुढे असेही म्हणाली, “एवढंच वाटत होतं तर हिंमत करून पुढं यायचं होतं आणि सांगायचं होतं की प्रभू तू मला स्पर्धक म्हणून कमजोर वाटतोस आणि मी तुला नॉमिनेट करतो. जर मला वाटलं असतं मी थेट बोललो असतो. राकेश दादाच्या या वागण्याचं मला वाईट वाटलं”, असे म्हणत प्रभूने राकेश बापटच्या कोणत्या गोष्टीचे वाईट वाटले, याबद्दल सांगितले.
बिग बॉस मराठीच्या घरातील समीकरणे पुढे कशी बदलणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच, या पर्वाचा विजेता कोण होणार, याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
