Prabhu Shelke Latest Video Bigg Boss Marathi 6: बिग बॉस म्हटलं की अनेक विविध गोष्टी घडताना दिसतात. कधी स्पर्धकांमधील मैत्री पाहायला मिळते, कधी त्यांच्यात होणारी भांडणे लक्ष वेधून घेतात. तर कधी हे स्पर्धक प्रेक्षकांना तसेच घरातील इतरांना खळखळून हसवताना दिसतात.
बिग बॉस या रिअॅलिटी शोचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. हिंदीसह भारतातील विविध भाषांमध्ये हा शो प्रदर्शित होतो. मराठीमध्येदेखील हा शो प्रदर्शित होतो. आतापर्यंत या शोचे पाच सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. जानेवारी २०२६ ला बिग बॉस मराठीचे सहावे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहे. ११ जानेवारीला बिग बॉस मराठीचा प्रिमिअर सोहळा पार पडला. यंदाच्या पर्वात १७ स्पर्धक सहभागी झाले आहे. अभिनय, सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि अशा अनेक क्षेत्रात काम करणारे स्पर्धक सहभागी झाले आहेत.
आता बिग बॉस मराठीच्या या सहाव्या पर्वात पहिल्या दिवशी काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आतापर्यंत दोन धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. एका प्रोमेमध्ये दोन स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. तन्वी कोलते आणि रुचिता जामदार यांच्यात मोठे भांडण झाले.
प्रभू शेळकेने केली बिग बॉसकडे ‘ती’ मागणी
आता बिग बॉस मराठीचा आणखी एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा प्रोमो पाहिल्यानंतर सर्वजण खळखळून हसताना दिसत आहेत. कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या प्रोमोमध्ये प्रभु शेळके बिग बॉसकडे साखर मागत असल्याचे दिसत आहे. तो म्हणतो, “ऐका बिग बॉस मला चहाची तल्लफ झाली. साखर पाठवा लवकर.” त्यानंतर ओ बिग बॉस असे म्हणत हाक मारत असल्याचे पाहायला मिळते. तो असेही म्हणतो की बिग बॉस मी तुम्हाला दिसतोय का? त्यानंतर राकेश बापट तिथे येतो आणि त्याला कॅमेरासमोर वर उचलतो. तो म्हणतो, “मला चहाची तल्लफ झाली आहे. मला साखर द्या.”
पुढे प्रोमोमध्ये तो एका स्पर्धकाला सांगतो की तो दिवसांतून तीन वेळा चहा पितो. तो पुन्हा कॅमेराकडे बघत बिग बॉसला विचारतो, “तुम्ही चहाची साखर देणार आहे की नाही? चहापत्ती, दूध आहे फक्त साखर हवी”, असे म्हणत तो बिग बॉसकडे साखरेची मागणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रभू जेव्हा बिग बॉसकडे साखर मागतो, तेव्हा इतर स्पर्धक हसताना दिसत आहेत. हा प्रोमो शेअर करताना कलर्स वाहिनीने, “चहासाठी प्रभुची कसरत पाहून घरातल्यांना हसू आवरेना…”, अशी कॅप्शन दिली आहे. तर चाहत्यांनी देखील यावर कमेंट करत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.
दरम्यान, बिग बॉस मराठीत सहाव्या सीझनमध्ये आणखी काय गमतीजमती घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
