लोकप्रिय मराठी कलाकारांची भावंडं विविध क्षेत्रात सक्रिय आहेत. काही कलाकारांच्या भावंडांचे स्वत:चे बिझनेस आहेत, तर काही कलाकारांची भांवडं सरकारी सेवेत रुजू आहेत. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडेने पोस्ट शेअर करत तिचा लहान भाऊ एम.पी.एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं सांगितलं होतं. संस्कृतीचा भाऊ MPSC परीक्षेत महाराष्ट्रात ४२ वा आला होता. यावेळी संस्कृतीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आता संस्कृती पाठोपाठ आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या भावाने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे प्राजक्ता चव्हाण.

सोनी मराठीवरील ‘तुझं माजं सपान’ या मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता चव्हाणने नुकतीच एक खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिच्या तमाम चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

प्राजक्ता चव्हाणचा भाऊ देशसेवेसाठी सैन्यदलात रुजू झाला आहे. नुकतंच त्याचं ट्रेनिंग पूर्ण झालंय. आता तो खऱ्या अर्थाने त्याच्या कामाची सुरुवात करणार आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर जेव्हा प्राजक्ताचा भाऊ घरी परतला, त्यावेळी त्याचं साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आलं. अभिनेत्रीने भावासाठी खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या संपूर्ण कुटुंबाची झलक पाहायला मिळतेय.

प्राजक्ता लिहिते, “वेलकम होम साहिल…ट्रेनिंग संपलं पण, आता अभिमान अजून वाढवा. माझा सैनिक भाऊ! तुझ्या मेहनतीचा, शिस्तीचा आणि देशसेवेच्या जिद्दीचा आम्हाला कायम अभिमान आहे. Proud Of You साहिल!”

प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या भावाचं अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, प्राजक्ता चव्हाणने ‘तुझं माजं सपान’ या मालिकेत महिला पैलवानाची भूमिका साकारली होती. महत्त्वाचं म्हणजे ती बालपणापासूनच कुस्तीच्या आखाड्यात वावरली आहे. या मालिकेत प्रेक्षकांना दोन पैलवानांची प्रेमकहाणी पाहायला मिळाली होती. तिच्यासह या मालिकेत अभिनेता संकेत निकम प्रमुख भूमिकेत झळकला होता.