Prajakta Gaikwad dance on Ahirani song: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. याबरोबरच ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. प्राजक्ता ‘स्मार्ट सुनबाई’, ‘लॉकडाऊन लग्न’, ‘सिंगल’, ‘वीर मुरारबाजी’, ‘भिडेवाडा’, ‘चेकमेट: द गेम नेव्हर एंड्स’ अशा सिनेमांतही दिसली होती. सध्या प्राजक्ता स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पाठराखीण’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करत आहे.

‘पाठराखीण’ या मालिकेत प्राजक्ताने प्राजक्ता ही भूमिका साकारली आहे. तिचे तिच्या कुटुंबावर विशेषत: बहिणीवर प्रचंड प्रेम असल्याचे पाहायला मिळते. बहिणीच्या सुखासाठी ती अनेक गोष्टी करते. प्राजक्ताबरोबरच या मालिकेत गौरी इंगवले, दीप्ती लेले, आशय कुलकर्णी, शुंभकर तावडे असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. या मालिकेतील कलाकार त्यांच्या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन तर करतातच, पण त्याचबरोबर ते त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

अहिराणी गाण्यावर प्राजक्ता गायकवाडचा जबरदस्त डान्स

आता प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की तिने लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे, केस मोकळे सोडले आहेत आणि मोजके दागिने घातले आहेत. तिचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साडी नेसून तिने ‘फिरी फिरी नाच पोरा, फिरी फिरी नाच’ या अहिराणी गाण्यावर डान्स केला आहे. तिच्या डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ता गायकवाडने ‘फिरी फिरी नाच…’ अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकऱ्यांनी केले प्राजक्ताचे कौतुक

प्राजक्ता गायकवाडच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “ताई तू खूप छान डान्स केला”, दुसऱ्या एकाने लिहिले, “अरे वाह! खानदेशी गाणं”, आणखी एकाने लिहिले, “तू खूप सुंदर आहेस”, एकाने लिहिले, “आमच्या खानदेशी गाण्यावर तर भारीच डान्स झाला ताई तुमचा”, दुसऱ्या एकाने लिहिले, “ट्रेडिंग गाणे, जय खानदेश, जय महाराष्ट्र”, एकाने लिहिले, “प्राजक्ता ताई तुम्ही उत्तर महाराष्ट्रमध्ये बोलली जाणारी खानदेशी अहिराणी गाण्यावर खूप सुंदर नृत्य केलं, आमच्या खानदेशी भाषेला व आदिवासी संस्कृतीला महाराष्ट्रात फेमस केलं म्हणून तुमचे मनस्वी धन्यवाद”, अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी प्राजक्ताचे कौतुक केले आहे.

दरम्यान, प्राजक्ता सध्या काम करत असलेल्या ‘पाठराखीण’ मालिकेत अनेक ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळते. आता आगामी काळात मालिकेत काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.