‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर प्राजक्ता अनेक प्रोजेक्ट्समध्ये झळकली. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने तिने कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ता सध्या एका वेगळ्या लूकमध्ये चाहत्यांना पाहायला मिळतेय. तिने नेहमीपेक्षा वेगळी हेअरस्टाइल केलीये. पण, अभिनेत्रीचा हा नवीन लूक तिच्या काही चाहत्यांना आवडलेला नाहीये.
प्राजक्ताच्या फोटोंवर, व्हिडीओवर कमेंट करत काही नेटकऱ्यांनी ही हेअर स्टाइल शोभत नाही असंही म्हटलं आहे. कलाक्षेत्रातील कोणतेच कलाकार ट्रोलिंग, सोशल मीडियावरील कमेंट्स फार जास्त मनावर घेत नाहीत. प्राजक्ता सुद्धा अशा निगेटिव्ह कमेंट्सकडे दुर्लक्ष करत प्रामाणिकपणे आपलं काम करते. मात्र, यावेळी आपल्या बहिणीची बाजू घेत तिच्या भावाने सर्व ट्रोलर्सला स्पष्ट उत्तर दिलं आहे.
प्राजक्ताचा नवा लूक पाहून “केसांची वाट लावली”, “विचित्र हेअर स्टाइल वाटतेय”, “केस का असे कापले…अजिबात शोभत नाहीये हा लूक”, “अजिबात सूट होत नाहीये ही हेअर स्टाइल”, “हे काय केलंय प्राजक्ता ताई” अशा असंख्य कमेंट्स नेटकऱ्यांनी पोस्टवर केल्या होत्या. यावर तिच्या भावाने पोस्ट शेअर करत प्राजक्ताची बाजू मांडली आहे.
प्राजक्ता गायकवाडच्या भावाची पोस्ट
नमस्कार मी ओम यादव, प्राजक्ता ताईचा भाऊ…
प्राजक्ता ताईच्या हेअर स्टाइलविषयी…
१) ही हेअर स्टाइल शोभत नाही… चला हे तुमचे म्हणणे मान्य करू पण, तिच्या एका चित्रपटाचे शूटिंग चालू असल्याने दिग्दर्शकाच्या विनंतीनुसार कथेच्या मागणीनुसार तशी हेअरस्टाइल केलेली आहे याची नोंद घ्यावी. ताईने हे स्वइच्छेने केलेले नाही.
२) “स्वराज्यरक्षक संभाजी” ही मालिका केल्यामुळे आपल्या सर्वांच्या मनात येसूबाई यांची एक आदराची भावना व प्रतिमा तयार झाली आहे त्यामुळे हेअरस्टाइल बदलली गेल्याने आपण सर्वच गडबडलो. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया व भावनेचा आदर करतो पण आपण ताईच्या करिअरचा सुद्धा आदर करुयात की… तिलाही वैयक्तिक आयुष्य आहे. थोडा संयम ठेवूयात.
३) ताईचे त्या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे त्यामुळे आता केस वाढवून परत पहिल्यासारखे १-२ महिन्यात होतीलच की.. त्यात एवढे ट्रोल करण्यासारखे काय आहे? राहिला विषय ट्रोलिंगचा तर ताई एक पण कमेंट वाचत नाही. ट्रोलिंग सहन करने ही काय नवीन गोष्ट नाही. शेवटी आम्ही अशा कलाक्षेत्रात आहोत की लोक आपले चांगले वाईट मत व्यक्त करत राहणार… आपल्या सर्वांचा आदर आहे. तिचाही करा एवढेच.

दरम्यान, प्राजक्ता गायकवाडने वैयक्तिक आयुष्यात २ डिसेंबर २०२५ रोजी शंभुराज खुटवड यांच्याशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाचे फोटो सर्वत्र तुफान व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर अभिनेत्री पुन्हा एकदा शूटिंगमध्ये व्यग्र झाली आहे. ती ६ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘भिडेवाडा… जाती पलीकडची माणसं’ या सिनेमात ती सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
