Prajakta Gaikwad Shared A Video : प्राजक्ता गायकवाड मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या ‘पाठराखीण’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर खूप चर्चेत असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी तसंच कामासंदर्भातील अपेडेट ती यामार्फत शेअर करत असते. अशातच आता तिने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

प्राजक्ता गायकवाडने अधिक मासनिमित्त तिच्या नवऱ्याबरोबरचा आणि कुटुंबीयांबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामधून तिने तिच्या आईने खास लेकीसाठी व जावयासाठी घेतलेल्या मेहनतीचं आणि प्रेमाचं कौतुक केलं आहे. प्राजक्ता सध्या मालिकेच्या चित्रीकरणामुळे व्यग्र असल्याने तिला पुण्याला तिच्या माहेरी जाता आलं नाही. म्हणून तिची आईच तिला भेटण्यासाठी मुंबईत आल्याचं तिने यामधून सांगितलं आहे. प्राजक्ता व तिचा नवरा शंभुराज खुटवडला तिच्या कुटुंबीयांनी खास भेटवस्तू दिल्याचंही यामधून पाहायला मिळतं.

प्राजक्ताने व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक

प्राजक्ताने हा व्हिडीओ शेअर करत त्याला मोठी कॅप्शनही दिली आहे. अभिनेत्री यामधून म्हणाली, “खर तर सध्या पाठराखीण या मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने मुंबईमध्ये आहे. सुट्टी नसल्यामुळे आपली लेक-जावई कधी येणार याची आपुलकीने वाट पाहणारे माझे आई वडील आणि भाऊ… पहिलाच अधिकमास… जरी शूट असल्यामुळे त्यांना येता आलं नाही तरी आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांच कौतुकाने धोंडे जेवण करू असा त्यांचा अट्टाहास.”

प्राजक्ता पुढे म्हणाली, “आणि खरच त्यांनी तसंच केल, अगदी पुरणपोळीच्या जेवणापासून ३३ अनारसे, सगळ्या भेटवस्तू , लाडक्या लेकीची ओटी, जावयाचं योग्य ते आदरातिथ्य असा सगळा घाट घातला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळ आई पुण्यावरून करून घेऊन आली. खूप कौतुक वाटल या गोष्टीचं. आपली लेक जरी अभिनेत्री असली, व्यग्र असली तरी तिचं आणि तिच्याबरोबरच विष्णूसमान असलेल्या आपल्या जावयाचं पण कौतुक व्हावं यासाठी त्या आईचं काळीज तुटत होतं, पण अखेर मन भरलं ते तिच्या हातच्या कटाच्या आमटीने.”

या व्हिडीओमधून प्राजक्ताच्या आईने तिला व तिच्या नवऱ्याला काही कपडे, दागिने आणि इतर गोष्टी भेट म्हणून दिल्याचं दिसतं. शिवाय त्यांचं औक्षणही केलं आहे. यामधून तिच्या आईने त्यांच्यासाठी खास भेट दिल्याचंही पाहायला मिळतं. ती भेट म्हणजे प्राजक्ताच्या आईने एक सुंदर अशी फोटो फ्रेम दिली आहे. प्राजक्ताच्या आईने त्यांच्यासाठी विविध प्रकारचे पदार्थही बनवून आणल्याचं यामधून दिसतं.

दरम्यान, सध्या प्राजक्ता तिच्या ‘पाठराखीण’ या मालिकेत व्यग्र असून यामध्ये तिच्या भूमिकेचं नावही प्राजक्ताच आहे. नुकतीच तिची ही मालिका सुरू झाली असून अनेक वर्षांनंतर तिने या मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं आहे.