Prajakta Gaikwad New Serial : लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता स्टार प्रवाहच्या ‘पाठराखीण’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका १ जूनपासून सुरू होणार आहे. यामध्ये प्राजक्तासह गौरी इंगवले देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्राजक्ता जवळपास ५ वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक करतेय. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे, ‘पाठराखीण’ मालिकेत प्राजक्ताच्या भूमिकेचं नाव सुद्धा प्राजक्ता हेच आहे.
सुरुवातीला अभिनेत्रीला भूमिकेचं नाव वेगळं असावं असं वाटलं होतं. पण, त्यानंतर टीमशी चर्चा करून, भूमिकेबद्दल जाणून घेतल्यावर तिलाही प्राजक्ता हे नाव भूमिकेसाठी परफेक्ट वाटलं. याबाबत अभिनेत्रीने राजश्री मराठीशी संवाद साधताना भावना व्यक्त केल्या आहेत.
प्राजक्ता गायकवाड म्हणते, “मी जवळपास ५ वर्षांनी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर येतेय. प्रेक्षक मला पाहून जेवढे उत्सुक आहेत…खरंतर मी सुद्धा या मालिकेसाठी तेवढीच जास्त आतुर आहे. प्रोमोला खूप छान प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे खांद्यावर एक नवीन जबाबदारी आहे. याशिवाय लग्नानंतर हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. माझ्या लग्नाला अवघे काही महिनेच झालेत…आणि याचदरम्यान या प्रोजेक्टसाठी सुद्धा माझी धावपळ सुरू होती. अर्थात मी या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतलीये.”
“लग्न झाल्यावर माझं थोडं वजन वाढलं होतं. कारण, मी खूप गोडाचे पदार्थ खाल्ले होते, सगळी धावपळ सुरू होती. पण, जेव्हा आपण एका मालिकेची लीड म्हणून काम करतो तेव्हा छान दिसणं, वेटलॉस या सगळ्या गोष्टी येतात. मग, मालिकेबद्दल जेव्हा समजलं तेव्हा मी डाएट सुरू केलं, जिम, वर्कआऊट करून मी ही भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाले. डेलीसोप म्हणजेच मालिका करणं हे अजिबात सोपं नाहीये. त्यामुळे मला सासरकडून आणि नवऱ्याकडून खूप जास्त पाठिंबा दिला गेलाय.” असं प्राजक्ताने चाहत्यांना सांगितलं.
प्राजक्ताचे पती शंभुराज खुटवड सुद्धा मालिकेच्या लॉन्चिंगला उपस्थित होते. यावेळी शंभुराज मोठ्या उत्सुकतेने प्राजक्ता रंगमंचावर येताच तिचा व्हिडीओ शूट करत होते. यावरून प्राजक्ताला तिचे अहो किती सपोर्ट करतात याची जाणीव होते.
दरम्यान, प्राजक्ता गायकवाडची ‘पाठराखीण’ मालिका १ जूनपासून रात्री ९ वाजता ऑन एअर होईल. या मालिकेला स्टार प्रवाहने प्राइम टाइम दिला आहे.
