प्राजक्ता गायकवाड मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत मालिका आणि चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या ती ‘स्टार प्रवाह’वरील नवीन मालिका ‘पाठराखीण’मध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकत आहे. अशताच आता तिने मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांचं कौतुक केलं आहे.
सुत्रिचा बांदेकर या अभिनयासह निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यांच्या आधीच दोन लोकप्रिय मालिका याच वाहिनी सुरू असून दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचा चांगल प्रतिसाद मिळत आहे. त्यांची ‘ठरलं तर मग’ ही मालिका तर घराघरात आवडीने पाहिली जाते आणि प्रेक्षकांमध्ये मालिकेची प्रचंड क्रेझ आहे. अशातच आता त्यांच्याच सोहम प्रोडक्शनची निर्मिती असलेली ‘पाठराखीण’ ही मालिका अलीकडेच सुरू झाली आहे. २ जून रोजी मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला. अशातच आता मालिका प्रदर्शित होण्यापूर्वी प्रमोशननिमित्त अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने सुचित्रा बांदेकर यांचं कौतुक केलं.
मालिकेबद्दल प्राजक्ताची प्रतिक्रिया
प्राजक्ताने त्यांना त्या सगळ्यांच्या पाठराखीण असल्याचं म्हटलं. मालिकेचं प्रमोशन करत असताना कार्यक्रमात तिला ‘स्टार प्रवाह’बरोबरची ही तुझी पहिलीच मालिका आहे काय सांगशील असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “खूप छान वाटत आहे. खरं तर आम्ही बोलण्यापेक्षा आमचं कामच जास्त बोलेन. मला स्टार प्रवाह आणि सोहम प्रोडक्शनचे खूप आभार मानायचे आहेत की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यासाठी धन्यवाद. दोन बहिणींची गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यांना ही गोष्ट नक्कीच आवडेल.”
प्राजक्ताने केलं सुचित्रा यांचं कौतुक
प्राजक्ता पुढे सुचित्रा बांदेकर यांच्याबद्दल म्हणाली, “सुचित्रा ताईला धन्यवाद म्हणायचं आहे की तिचा कायम पाठिंबा असतो. ती आमची खऱ्या अर्थाने पाठराखीण आहे आणि सोहमचासुद्धा खूप पाठिंबा असतो. म्हणून आम्ही खूप सकारात्मक वातावरणात काम करू शकत आहोत.”
प्राजक्ता गायकवाडबद्दल बोलायचं झालं तर ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते ‘झी मराठी’वरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे. यामध्ये तिने महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी ती याच वाहिनीवरील ‘नांदा सौख्य भरे’, ‘आई माझी काळूबाई’ यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. यानंतर अभिनेत्री चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली. अलीकडेच तिच्या लग्नादरम्यान तिचा व अभिनेत्री सायली देवधरचा ‘स्मार्ट सुनबाई’ हा चित्रपट रिलीज झाला होता.
