Prajakta Gaikwad Talks About Mother In Law : प्राजक्ता गायकवाड मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ताने काही दिवसांपू्र्वीच लग्न केलं. तिनं शंभुराज खुटवडसह मराठमोळ्या पद्धतीनं थाटामाटात पुण्यात लग्न केलं. अशातच आता लग्नानंतर तिनं तिच्या वैवाहिक जीवानबद्दल सांगितलं आहे.
प्राजक्ता व शंभुराज यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल, पहिल्या भेटीबद्दल आणि आता लग्नानंतर सुरू झालेल्या संसाराबद्दल सांगितलं आहे. प्राजक्तानं यावेळी तिच्या सासरच्या मंडळींबद्दलही सांगितलं आहे.
प्राजक्ता गायकवाड व शंभुराज खुटवड यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी प्राजक्ताला नुकतंच लग्न झालं आहे. सासरी गेली आहेस, कसं वाटतंय, कोणाची तिथे जास्त मदत होतेय, असे प्रश्न विचारल्यानंतर ती म्हणाली, “सगळ्यांचीच मदत होत आहे. सगळ्यांबरोबरच खूप छान नातं निर्माण झालं आहे. मला हे कोणी वेगळी लोक आहेत, असं वाटत नाही. आपलेच आहेत, असं वाटतं.”
सासूबाईंबद्दल प्राजक्ता गायकवाडची प्रतिक्रिया
\प्राजक्ताचे पती शंभुराज यावेळी म्हणाले, “माझ्यापेक्षा आईबरोबर तिचं जास्त जमतं. सून म्हणून नाही, तर मुलगी म्हणून त्यांनी तिचा स्वीकार केला आहे.” प्राजक्ता याबद्दल म्हणाली, “मला त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितलं की, हे घर, संसार, स्वयंपाक या गोष्टींकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. तू तुझं करिअर, तुझं डाएट, तुझं फिटनेस, शूटिंग हे सगळं सांभाळ. घरचं करायला मी आहे.”
सासूबाईंबद्दल प्राजक्ता म्हणाली, “त्यामुळे तो खूप मोठा सपोर्ट आहे मला आणि माझ्या कुटुंबालासुद्धा तेच हवं होतं. आता करिअर झालेलं आहे, तर ते अजून छान घडावं”. प्राजक्ता पुढे शंभुराज यांच्याबद्दल म्हणाली, “त्यांचासुद्धा खूप छान सपोर्ट असतो. म्हणजे लग्नानंतर ३-४ दिवसांनंतर मी घराबाहेर पडले. एका चित्रपटाचं डबिंग होतं. आम्ही दोघेही डबिंगसाठी गेलो होतो. तेसुद्धा माझ्याबरोबर आले होते. त्यामुळे काही वाटत नाही. इतका पाठिंबा देणारे लोक असतील, तर छान वाटतं आणि काम करायलाही हुरूप येतो.”
प्राजक्ता पुढे म्हणाली, “पप्पा म्हणजे माझे सासरे लग्नानंतर दुसऱ्या दिवशी स्वत: बाजारात गेले आणि गाजर, काकडी अशा डाएटच्या गोष्टी घेऊन आले. त्यांचा भाऊ यश यांच्याबरोबरसुद्धा खूप छान बाँड झाला आहे. सगळेच खूप छान आहेत.”
