अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी ९० च्या दशकात मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय टेलिव्हिजनवर ‘चार दिवस सासूचे’, ‘का रे दुरावा’ ते सध्या सुरू असलेली ‘ठरलं तर मग’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता यांनी इंडस्ट्रीत आलेले अनुभव, छोट्या पडद्यावरील मालिका, सुपरस्टार अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

१९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दामिनी’ चित्रपटात प्राजक्ता कुलकर्णी यांनी उर्मी ही भूमिका साकारली होती. या सिनेमात दामिनीचा दीर उर्मीवर अतिप्रसंग करतो असा सीन आहे. या रेप सीनच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव आणि तो सीन शूट करताना आलेलं दडपण याबाबत प्राजक्ता यांनी,
‘अभिजात मराठी फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या, “बापरे…माझ्यावर खरंच खूप प्रेशर होतं. राकेश त्या मुलीवर बलात्कार करतो असा तो सीन होता आणि ती भूमिका अभिनेता अश्विन कौशल साकारत होता. हा सीन खरंतर आम्ही फार नंतर शूट केला. त्या आधी त्याचं माझ्या मागे लागणं वगैरे सुरू होतं. ते दिग्दर्शकाच्या लक्षात आलं होतं की, हा जरा माझ्या मागे लाळ गाळतोय. ते मला म्हणाले होते, बघ प्राजक्ता तुला जराही घाबरायचं नाहीये…तो जरा काही जास्त करेल तर, मी इथेच आहे त्याला बरोबर बघतो. याशिवाय त्यांनी अश्विनला आधीच सांगून ठेवलं होतं…जेवढं पाहिजे तेवढं करायचं उगाच जास्तीचं काही सीनमध्ये करायचं नाही.”

“खरं सांगू का…तो सीन शूट करणं वेगळं पण, आपण आजकाल जे ऐकतोय की, बलात्काराच्या बातम्या वाचतो…हे सगळं पाहून अस्वस्थ व्हायला होतं. हेल्पलेस होणं म्हणजे काय असतं… तो अनुभव मी त्या सीनचं शूटिंग करताना घेतला. आताही हे सांगताना अंगावर काटा येतोय…खरंच त्या सगळ्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. कधीतरी कायदाही खूप सौम्य आहे असं वाटतं…या अशा आरोपींनी तिथल्या तिथे शिक्षा दिली पाहिजे.” असं मत प्राजक्ता कुलकर्णींनी व्यक्त केलं.

दरम्यान, प्राजक्ता कुलकर्णी ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीच्या सासूबाईंची म्हणजेच कल्पना सुभेदार ही भूमिका साकारत आहेत. सुनेला प्रत्येक गोष्टी साथ देणारी…साधीभोळी प्रेमळ आणि प्रसंगी तेवढीच कणखर असलेली कल्पना सर्वांची आवडती आहे. ही मालिका स्टार प्रवाहवर रात्री ८:३० वाजता प्रसारित केली जाते.