अलीकडच्या काळात दैनंदिन मालिकांचं शूटिंग हे जवळपास १२-१३ तास सुरू असतं. त्यामुळे छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या सगळ्याच कलाकारांचं संपूर्ण शेड्युल व्यग्र झालेलं आहे. अनेकदा महाएपिसोड, एक किंवा दोन तासांचे विशेष भाग असले की, शिफ्ट सुद्धा एक्सटेंड केली जाते. त्यामुळे घरातील सगळं काम आवरून वेळेत सेटवर पोहोचणं हा या कलाकारांसाठी विशेषत: अभिनेत्रींसाठी मोठा टास्क असतो. याबद्दल ‘ठरलं तर मग’ मालिकेत कल्पनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केलं आहे.
प्राजक्ता कुलकर्णींनी आजवर मराठीसह हिंदी कलाविश्वात सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. हिंदीतल्या अनेक स्टार कलाकारांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. पण, तुम्हाला माहितीये का, आजही त्या घरातील सगळी काम आवरून मग, सेटवर पोहोचतात. त्यांच्या घरात स्वयंपाक करण्यासाठी मदतनीस नाहीये.
प्राजक्ता कुलकर्णी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “मी लहान असताना, माझी आई जॉब करायची आणि ती घरातून सकाळी पावणेसात वाजता निघायची. त्याआधी ती घरातलं सगळं काम आवरून जायची. लहानपणी तिची मेहनत इतकी कळून यायची नाही. पण, मी जेव्हा मोठी झाले तेव्हा मला सगळं समजू लागलं. माझ्या सासूबाई सुद्धा जॉबला जायच्या, त्या सुद्धा सगळं करून जायच्या. त्यामुळे मलाही घरातलं सगळं काम आवरून शूटिंगला जायची सवय लागली. माझ्या घरच्यांचा मला पहिल्यापासून खूप जास्त सपोर्ट होता, म्हणूनच अनेक गोष्टी सुरुळीत झाल्या.”
अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “२००४ मध्ये आम्ही अंधेरीला शिफ्ट झालो तेव्हा माझ्यावर घरातली संपूर्ण जबाबदारी आली. मी तेव्हा मग सगळ्या गोष्टी एकटी करायचे. माझ्याकडे आजही स्वयंपाकाला बाई नाहीये. कदाचित मला ते झेपणार सुद्धा नाही…म्हणून स्वयंपाकाचं मीच बघते. लवकर कॉल टाइम असतो, अनेकदा शिफ्ट एक्सटेंड होते… तरीही मी हे सगळं मॅनेज करते. मी कधीही घरचं काम सेटवर नेत नाही…आणि तसंच सेटवरचं प्रेशर मी घरी असताना घेत नाही. यामुळे आपलं आयुष्य सोपं होतं.”
“मुळात मला घरच्यांनी खूप सपोर्ट केला. आम्ही अंधेरीला राहायलो आलो तेव्हा नवऱ्याने आणि माझ्या मुलाने त्या दोघांनीही मला खूप मदत केली. तेव्हा माझा मुलगा जय ९ वर्षांचा होता. म्हणून तेव्हा त्याला सांभाळण्यासाठी दिवसभर एक मदतनीस घरी असायची. मला तेव्हा घरी यायला रात्रीचे साडेअकरा वाजायचे. एकीकडे ‘चार दिवस सासूचे’ मालिकेचं शूटिंग असायचं तर, ‘अवंतिका’चं शूटिंग तेव्हा पुण्यात असायचं. तेव्हा मग मी घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी शूटिंगच्या वेळा मॅनेज करून घेतल्या होत्या. पण, माझ्या मुलाने कधीही तक्रार केली नाही की, “तुम्ही मला वेळ दिला नाहीत…” त्याने नेहमी मला समजून घेतलं. त्याने कधीही माझ्याकडे काहीच मागितलं नाही, त्याने खरंच मला खूप सपोर्ट केला.” असं प्राजक्ता कुलकर्णींनी सांगितलं.
