Actress Prajakta Mali : ३१ डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने सेलिब्रेट करतात. काहीजण फिरायला जातात, काही लोक पार्ट्या करतात, अनेकजण आपल्या कुटुंबीयांसह वेळ घालवतात. सामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रिटी सुद्धा आपल्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत ३१ डिसेंबरचा दिवस साजरा करण्यासाठी विविध ठिकाणी फिरायला जातात किंवा आपल्या कुटुंबीयांसह नवीन वर्षाचं स्वागत करतात.

मराठी कलाविश्वाची ‘फुलवंती’ अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील २०२५ चा शेवटचा दिवस खास पद्धतीने साजरा केला. याची खास झलक तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना प्राजक्ताने तिच्या कुटुंबीयांसह धमाल केल्याचं तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री चुलीवर जेवण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला तिने “Today’s Menu चुलीवरचं व्हेज जेवण…” असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये अभिनेत्री चुलीवर गरमागरम जेवण बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

तर, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये प्राजक्ता व तिचे कुटुंबीय सध्या सर्वत्र ट्रेंडिंग असणाऱ्या अक्षय खन्नाच्या fa9la या अरेबिक गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “आमची क्रेझी फॅमिली… आज २० वर्षे झाली आम्ही नवीन वर्ष याचप्रकारे एकत्र साजरं करतो.” याशिवाय अभिनेत्रीने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये शेकोटी पेटवल्याचं देखील पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे ३१ डिसेंबर २०२५ चा दिवस प्राजक्ता माळीने आपल्या कुटुंबीयांसह साजरा केला. यावेळी तिने आपल्या कुटुंबासह खूप धमाल केली. प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ती लवकरच ‘देवखेळ’ या Zee 5 च्या सीरिजमध्ये झळकणार आहे. तिच्यासह या सीरिजमध्ये सुपरस्टार अंकुश चौधरी प्रमुख भूमिका साकारणार आहे. लवकरच ही सीरिज प्रदर्शित होईल.