महाराष्ट्राची ‘फुलवंती’ म्हणून अभिनेत्री प्राजक्ता माळीला ओळखलं जातं. ती उत्तम अभिनेत्री आहेच पण, याच जोडीला प्राजक्ता यशस्वी निर्माती व उद्योजिका म्हणून देखील ओळखली जाते. प्राजक्ताने ३ वर्षांपूर्वी ‘प्राजक्तराज’ हा तिचा दागिन्यांचा ब्रँड सुरू केला. याला गेल्या काही वर्षांत चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला. याशिवाय प्राजक्ता नेहमीच विविध पारंपरिक दागिने इन्स्टा लाइव्हच्या माध्यमातून लॉन्च करत असते. आता प्राजक्तराजला ३ वर्षे पूर्ण झाल्यावर प्राजक्ता माळीने एक खास दागिना, तोही एका खास व्यक्तीच्या हस्ते लॉन्च केला आहे.
सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ६ जानेवारीला शूटिंग पार पडल्यावर प्राजक्ताने लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेरावला फोन केला आणि तिच्या हस्ते हा खास दागिना लॉन्च व्हावा अशी प्राजक्ताची मनापासून इच्छा होती. ‘प्राजक्तराज’ला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्रीने लॉन्च केले आहेत शिंदेशाही तोडे.
प्राजक्ता म्हणते, “मी हास्यजत्रेचं शूट करत होते. नमू ही माझी अत्यंत जवळची आणि गोड मैत्रीण आहे. तिच्या हस्ते दागिना लॉन्च करावा अशी माझी इच्छा होती. त्यामुळे मी तिला फोन केला आणि ती एका सेकंदात हो म्हणाली… मी येते. परफॉर्म केलं…हास्यजत्रेचं शूट झाल्यावर आजारी असूनही ती लाइव्हसाठी थांबली! थँक्यू नमू… आज आमच्या प्राजक्तराजला ३ वर्षे पूर्ण झाली आहे. तर आज नमूच्या हस्ते आपण दागिना लॉन्च करणार आहोत…याचं नाव आहे शिंदेशाही तोडे!”

प्राजक्तासाठी नम्रताने खास पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणते, “प्राजू खूप अभिमान वाटतो तुझा… स्वप्न पाहतेस आणि ती पूर्ण करण्यासाठी धपडतेस. अशीच मोठमोठाली स्वप्न बघत राहा. प्राजक्तराजला ३ वर्षे पूर्ण झाली आणि तू मला तुझ्या या आनंदात सहभागी केलंस आणि शिंदेशाही तोडे मला भेट म्हणून दिलेस. अत्यंत सुबक ठसठशीत असे हे तोडे अत्यंत वाजवी दरात तू उपलब्ध करून दिलेस. ‘प्राजक्तराज’ या तुझ्या ब्रँडमध्ये त्याचा समावेश केलास त्यासाठी खूप मेहनत घेतलीस. तुझ्यामुळे दागिन्यांची परंपरा त्यांचा इतिहास पुन्हा एकदा उलगडतोय….आभार तुझे आणि खूप शुभेच्छा तुला!”
नम्रताच्या या पोस्टवर प्राजक्ताने “किती गोड पोस्ट…गोड माणसांसाठी गोड अलंकार…शिंदेशाहीतोडे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा नवा सीझन ५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा कार्यक्रम सोमवार-मंगळवार रात्री ९ वाजता प्रसारित सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून प्राजक्ता माळीने जबाबदारी सांभाळली आहे.
