Prajakta Mali Jewellery Brand Name Change PrajaktSaj : अभिनेत्री प्राजक्ता माळीने २०२३ मध्ये म्हणजेच साधारण तीन वर्षांपूर्वी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. तिने स्वत:चा ‘प्राजक्तराज’ हा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. अभिनेत्रीच्या या ज्वेलरी ब्रँडला भरभरून यश मिळालं. मात्र, आता प्राजक्ताने तिच्या ब्रँडसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असताना प्राजक्ताने तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव बदललं आहे. आता इथून पुढे ‘प्राजक्तराज’ऐवजी तिचा ब्रँड ‘प्राजक्तसाज’ म्हणून ओळखला जाईल. यामागचं कारण अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे.
प्राजक्ता माळी म्हणाली, “नमस्कार! आजच्या लाइव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचं लाइव्ह अतिशय स्पेशल आणि एका स्पेशल कारणासाठी आहे. अर्थात हे माझ्या आणि आपल्या ब्रँडसंदर्भात आहे. आता नव्या आर्थिक वर्षात माझ्या ज्वेलरी ब्रँडचं नाव असणार आहे ‘प्राजक्तसाज – Reviving Maharashtra’s Legacy’. मला माहितीये ही खूप मोठी गोष्ट आहे.”
प्राजक्ता पुढे म्हणाली, “मी तीन-सव्वातीन वर्षांपूर्वी हा ब्रँड सुरू केला होता. तेव्हा मला बिझनेसविषयी काहीच कल्पना नव्हती. फक्त यामागे एकच विचार होता की, आपले मराठमोळे, पारंपरिक दागिने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणायचे. अर्थात तीन वर्षांपूर्वी मला बिझनेसमधलं इतकं काहीच कळत नव्हतं. पण, आता हा बिझनेस इतका मोठा होईल याची मला खरंच कल्पना नव्हती. आता दागिन्यांचा जेवढा खप आपल्या महाराष्ट्रात आहे…तेवढाच खप भारतात आणि संपूर्ण जगात आहे. ग्राहकांच्या अतिशय उत्तम प्रतिक्रिया येत आहे. पण, अनेकदा शिपिंगदरम्यान खूप अडथळे आले…म्हणून ठरवलं यातून आता मार्ग काढायचा. यातूनच ‘प्राजक्तसाज – Reviving Maharashtra’s Legacy’ हे नाव जन्माला आलेलं आहे. आम्हाला लोगो सुद्धा बदलायचा होता पण, आता जो आहे त्याच्यापेक्षा सुंदर लोगो आम्हाला सापडला नाही. त्यामुळे लोगो सेम राहील. लोगोवर माझ्याच हस्ताक्षरात नाव लिहिलेलं आहे.”
“याशिवाय मला टॅगलाइनमध्ये ‘महाराष्ट्र’ शब्द हवा होता. अर्थात यामागे अजूनही बरीच कारणं आहेत. जी मी तुम्हाला कधीच सांगू शकणार नाही… पण, माझा विश्वास आहे की, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता या क्षणापासून तुम्ही गुगलवर गेलात तर तुम्हाला नावात बदल झालेला दिसेल. तुम्ही तुमचं प्रेम आणि पाठिंबा कायम ठेवा….खूप खूप धन्यवाद!” असं प्राजक्ताने सांगितलं.
