Prajakta Shukre clarifies relationship rumors with Rahul Vaidya : प्राजक्ता शुक्रे ही एक लोकप्रिय गायिका असून तिने ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या पर्वात भाग घेतला होता. त्या स्पर्धेत ‘टॉप ५’ मध्ये पोहोचणारी ती एकमेव महिला गायिका होती. अलीकडेच ती ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दिसल्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. 

प्राजक्ता ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाच्या घरामध्ये अनेकदा गाणी गात इतर स्पर्धकांचं मनोरंजन करायची. तिच्या गाण्यांचं इतर स्पर्धक कौतुक करायचे. परंतु, अर्ध्यातच गायिकेची या शोमधून एक्झिट झाली. अशातच आता तिने सिद्धार्थ कन्नला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने ‘इंडियन आयडॉल’ आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी तिने राहुल वैद्यबरोबरच्या नात्याबद्दलही सांगितलं आहे.

राहुल वैद्यबरोबरच्या नात्याबद्दल काय म्हणाली प्राजक्ता शुक्रे?

मुलाखतीत तिला “तू राहुल वैद्यबरोबर रिलेशनशिपमध्ये होती का?” असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “नाही. आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिणी होतो.” त्यानंतर तिला “तुमच्या रिलेशनशिपबद्दल खूप अफवा होत्या” असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “तेव्हा आम्ही खूपच लहान होतो. १६ वर्षांचे होतो प्रेम वगैरे तेव्हा काहीच कळायचं नाही. पण, ती इतकी जुनी आणि निरर्थक गोष्ट आहे की त्याबद्दल बोलण्यात काही अर्थच नाही.”

प्राजक्ता पुढे राहुलबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाली, “आम्ही एकमेकांना आवडायचो. एकत्र खूप काम केलं आहे. मराठीपण ही एक समान गोष्ट होती.  तेवढंच पण, लोकांना नावं जोडायला खूप आवडतं, की हे दोघे छान दिसतात एकत्र वगैरे.” राहुलच्या स्वभावाबद्दल गायिका पुढे म्हणाली, “त्याचा स्वभाव सगळ्यांना माहीतच आहे की तो बोलायला लागला तर खूप बोलतो, पण आम्ही दोघे खूप लहान होतो. कुठलाही निर्णय घेण्यासाठी बुद्धी नव्हती.”

प्राजक्ताला पुढे “राहुलने तुला प्रपोज केलं होतं का?” असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “नाही. मी यापेक्षा जास्त काहीही सांगणार नाही. तो फक्त म्हणालेला, तू खूप चांगली मुलगी आहेस मला आवडतेस पण, मी इथेच थांबणार आहे एवढंच. मीसुद्धा त्याला  तूही चांगला माणूस आणि गायक आहेस इतकंच म्हणाले होते.”

प्राजक्ताला पुढे त्याने तुला सांगितलं की “तू मला आवडतेस पण मी इथेच थांबणार आहे याचा अर्थ नक्कीच त्याला हे रिलेशन हवं होतं पण, निर्णय तुझ्यावर सोडला होता मग तू स्वत:ला का थांबवलंस?” असं विचारल्यानंतर गायिका म्हणाली, “मी असं नाही म्हणणार की आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. त्यावेळी आम्ही खूप कामात व्यग्र होतो. स्वत:ला शोधत होतो. प्रवास करत होतो. त्यामुळे त्यात कुठला अडथळा नको होता. तो चांगला मित्र होता. ज्याला मी आवडायचे, मला त्याच्याबरोबर राहायला आवडायचं इतकंच होतं.”