Bigg Boss 19 Daily Updates : ‘बिग बॉस १९’मधून नुकतेच नीलम गिरी आणि अभिषेक बजाज हे दोन स्पर्धक बाहेर पडले. शोमधून येताच दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. अशातच नीलमने ‘स्क्रीन’बरोबरच्या मुलाखतीत, तान्याशी असलेल्या मैत्रीबद्दल सांगितलं आणि घराबाहेर पडल्यावर स्पर्धकांना काय अनुभव येतो यावरही विचार मांडले.

‘बिग बॉस’ शोबद्दल नीलम म्हणाली, “पहिल्या आठवड्यात मी खूप घाबरले होते. खेळाचे काय नियम आहेत ते मला समजत नव्हते. माझ्यासाठी हा एक खूप मोठा मंच होता, त्यामुळे मी खूपच नर्व्हस होते. मला काय करायचंय तेच कळत नव्हतं, पण नंतर मी जशी आहे तसंच राहायला सुरुवात केली. ‘बिग बॉस’नंतर माझं जीवन पूर्णपणे बदललं आहे. ‘बिग बॉस’मुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली आहे आणि हा अनुभव खूप सकारात्मक ठरला आहे. आता मला काही उत्तम प्रोजेक्ट्स मिळावेत असं वाटतं. मी टीव्ही आणि सिनेमामध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहे. जर एखादा रिअॅलिटी शो किंवा गाणं आलं तर मी ते नक्कीच स्वीकारेन.”

पुढे नीलमने अभिषेकच्या एलिमिनेशनवरही तिचं मत व्यक्त केलं. तसंच ‘बिग बॉस १९’च्या निर्मात्यांच्या पक्षपातीपणाबद्दलही सांगितलं. ती म्हणाली, “माझ्या मते निर्माते पक्षपाती नाहीत, पण अभिषेकचं एलिमिनेशन खरंच धक्कादायक होतं. प्रणित अभिषेकला वाचवू शकला असता, पण तो इतक्या दबावाखाली होता की त्याला नीट विचार करता आला नाही. मी असं मानत नाही की ‘बिग बॉस’ने त्याचं एलिमिनेशन प्लॅन केलं. मला असं वाटत नाही की निर्मात्यांचा याच्याशी काही संबंध होता. पण मी असं म्हणेन की, मला निर्मात्यांकडून योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान सर जे दाखवलं गेलंय त्याचं स्पष्टीकरण द्यायचे. पण, आम्हाला कधीच अशी स्क्रिप्ट दिली गेली नाही.”

नीलम गिरी इन्स्टाग्राम पोस्ट

यानंतर नीलम तान्या मित्तलबरोबरच्या मैत्रीबद्दल म्हणाली की, “सुरुवातीला अनेक स्पर्धकांनी माझ्या खेळावर टीका केली होती. पण, मी तान्या मित्तलबरोबर चांगली मैत्री केली. आम्ही शोमध्ये खूप चांगले मित्र झालो. माझ्या मते तान्याच्या मैत्रीचा माझ्या खेळावर परिणाम झाला नाही. मी तिला एक चांगली मैत्रीण मानते. ती आपल्या सोयीप्रमाणे खेळली असेल, पण मी असं मानत नाही की आमच्या मैत्रीचा एकमेकांच्या खेळावर काही परिणाम झाला.”