प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या लाइव्ह शोदरम्यान एका तरुणाने महिलांबाबत अतिशय अश्लील वक्तव्य केलं. मात्र, हा तरुण या विचित्र गोष्टी सांगत असताना प्रणितने आक्षेप घेण्याऐवजी संबंधित तरुणाला ‘प्राइज मनी’ देत त्याचं कौतुक करून, त्याला प्रोत्साहन दिल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रणितच्या शोमध्ये सहभागी झालेला हिमांशु जांग्रा स्वत:च्या डेटिंगचा अनुभव सांगत होता. “बिर्याणीचं ३७० रुपयांचं बिल भरलंय, मग ते पैसे वसूल नको का करायला?” म्हणजेच बिर्याणीच्या पैशांच्या बदल्यात तो महिलेकडून लैंगिक संबंधांची अपेक्षा करत होता. प्रणित मोरे आणि प्रेक्षक म्हणून सहभागी झालेल्या हिमांशुच्या संभाषणाचे वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. यावर सध्या मनोरंजनसृष्टीतून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने पोस्ट शेअर करत प्रणितच्या कार्यक्रमांवर आपण बंदी घातली पाहिजे अशी मागणी केली आहे. नेहा मांडलेकर लिहिते, “प्लीज, आपण प्रणित मोरेला रंगमंचावर परफॉर्म करण्यापासून पूर्णत: बॅन करूयात का…अशा मूर्ख लोकांना हातात माइक घेऊन बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये.”

“जेव्हा हा माणूस बोलत होता की, त्याने ३७० रुपयांच्या बिर्याणीची ‘वसुली’ करण्यासाठी कसा गर्लफ्रेंडच्या टॉपमध्ये हात टाकला…आणि यादरम्यान उपस्थित अन्य प्रेक्षक जे हसत आहेत…हे सगळं खरंच अस्वस्थ करणारं आहे. यापेक्षा अस्वस्थ करणारी बाब म्हणजे…या प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या महिलांचा सुद्धा हसण्याचा आवाज ऐकू येतोय.” अशी पोस्ट शेअर करत नेहाने याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

neha mandlekar
नेहा मांडलेकरची पोस्ट

मालती चहर, अपूर्वा नेमळेकर, सई गोडबोले यांसह अनेक लोकप्रिय कलाकार व नेटकऱ्यांनी प्रणितच्या शोमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरणाचा वाद वाढल्यावर प्रणित आणि हिमांशूने सोशल मीडियावर माफी मागून त्यांचं अकाऊंट बंद केल्याची माहिती समोर आली आहे. यासह हिमांशूला नोकरीवरून देखील काढून टाकण्यात आलं आहे. त्याच्या कंपनीच्या संस्थापकांनी व्हिडीओ शेअर करत त्याची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली आहे.