Pranit More Sejal Pawar Viral Video Controversy: बिग बॉस फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या एका पाठोपाठ एक येणाऱ्या व्हायरल व्हिडीओमुळे मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्या शोमधील हिमांशू जांगरा नावाच्या तरुणाचा ‘३७० रुपयांची बिर्याणी’ आणि मुलीबद्दलचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला नोकरी गमवावी लागली होती. या वादानंतर प्रणित मोरेने जाहीर माफी मागून आपले इन्स्टाग्राम अकाउंट डिअॅक्टिव्हेट केले आहे. मात्र, हा वाद ताजा असतानाच आता प्रणितच्या शोमधील आणखी एक अत्यंत लाजिरवाणी जुनी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या नव्या व्हिडीओमध्ये पेशाने डॉक्टर असलेल्या एका तरुणीने मेडिकल कॉलेजच्या डिसेक्शन रूममधील मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अत्यंत आक्षेपार्ह विनोद केला असून, यावरून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हिमांशू जांगराच्या वक्तव्याचा हा वाद शमण्यापूर्वीच प्रणित मोरेच्या शोमधील आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही एक जुनी क्लिप आहे, यात पेशाने डॉक्टर असलेल्या एका मुलीने मेडिकल रूममधील एक किस्सा शेअर केला होता. त्या क्लिपमध्ये ती मुलगी एका मृत पुरुषाच्या गुप्तांगावर विनोद करताना दिसत आहे. त्यामुळे या तरुणीच्या व्हिडीओवरून वाद का झाला नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
नेमका काय आहे ‘३७० रुपये बिर्याणी’ वाद?
प्रणित मोरेच्या एका स्टँड-अप शो दरम्यान, प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका तरुणाने आपला एक किस्सा सांगितला होता. त्याने सांगितलं की, तो एका मुलीला भेटला, ते बोलले आणि मग डेटवर गेले. तिथे त्यांनी ३७० रुपयांची बिर्याणी खाल्ली, ज्याचे बिल त्या तरुणाने भरले. यानंतर ती मुलगी घरी जात होती, पण त्या मुलाला बिर्याणीचे पैसे वसूल करायचे होते. इथे पैसे वसूल करण्याचा अर्थ म्हणजे त्याला तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे होते. तो हे सांगत असताना उपस्थित सर्वजण हसतात आणि प्रणित मोरे देखील यावर प्रतिक्रिया देत याला ‘पीक गुरुग्राम कंटेंट’ म्हणतो.
हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि प्रणित मोरेवर युजर्स संताप व्यक्त करू लागले. प्रणितने त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट बंद केलं. मालती चहर, कुशा कपिला, रश्मी देसाई, अपूर्वा नेमळेकरसह अनेक सेलिब्रिटींनी यावरून त्या मुलासह प्रणितला खडे बोल सुनावले. याचदरम्यान त्याच्या शोमधील जुन्या क्लिप्स व्हायरल होऊ लागल्या. त्यापैकी एका व्हिडीओत एक महिला डॉक्टरने मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सबद्दल टिप्पणी करताना दिसतेय. त्या व्हिडीओवरही आता नेटकरी संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.
मृतदेहाच्या गुप्तांगाची उडवली खिल्ली
एक महिला डॉक्टर प्रणित मोरेच्या शोमध्ये आली होती. ती मेडिकल कॉलेजच्या ‘डिसेक्शन रूम’मधील (पोस्ट मॉर्टेम रूम) तिचा अनुभव सांगताना दिसते. ती म्हणते की, पोस्टमॉर्टम आणि डिसेक्शन दरम्यान सर्वात आधी पोट आणि कवटी उघडली जाते, आणि शेवटी प्रायव्हेट पार्ट्सची तपासणी केली जाते. यावर प्रणित मोरे गमती म्हणतो, “तू नक्की डॉक्टर आहेस की कसाई? तिथे सगळे लोक गंभीर असतात की विनोदही केले जातात?” यावर उत्तर देताना ती डॉक्टर म्हणते की, तिथे कधीकधी लोक मृतांच्या प्रायव्हेट पार्ट्सच्या आकारावरून विनोद करतात.
हे ऐकून प्रणित म्हणतो, “काय? तुम्ही लोक अशा गोष्टी बोलता? बिचाऱ्या काकांनी चांगल्या कामासाठी आपले देहदान केले आणि तुम्ही हे सगळं बोलता.” यानंतर तो पुढे गंमतीने म्हणतो, “आता आम्ही आमचे शरीर कसे दान करणार?”
महिला डॉक्टरच्या विधानावर युजर्सचा संताप
ही क्लिप शेअर करत एका युजरने लिहिलं, “कल्पना करा, जर हीच गोष्ट एखादा पुरुष डॉक्टर महिलेच्या गुप्तांगाबद्दल बोलला असता, तर त्याला बलात्कारी म्हणून नोकरीवरून काढून टाकलं असतं. पण मुलगी असे करू शकते आणि तिला कोणतीही शिक्षाही मिळत नाही, पण असं का?”
तसेच दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “विचार करा, तुमचे कुटुंब अंत्यसंस्कार करण्याऐवजी तुमचे शरीर मेडिकल रिसर्चसाठी दान करते आणि नंतर अशा डॉक्टरला तुमच्या गुप्तांगाची खिल्ली उडवताना पाहते.”
मृत लोकांबद्दल काहीच आदर नाही..
महिला असण्याचा पुरेपूर फायदा..
दरम्यान, हिमांशू जांगराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या महिला डॉक्टरची क्लिपही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी आता सोशल मीडियावर केली जात आहे.
