Pranit More-Himanshu Jangra Controversy: प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये सहभागी झालेल्या एका प्रेक्षकाने महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह व अपमानजनक वक्तव्य केल्याने सध्या सोशल मीडियावर ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’चा वाद चांगलाच पेटला आहे. प्रणित मोरे आणि प्रेक्षक म्हणून सहभागी झालेल्या हिमांशुच्या संभाषणाचे वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत.
प्रणितच्या स्टँडअप शोदरम्यान हा हिमांशू स्वत:च्या डेटिंगचा अनुभव सांगत होता. यावेळी त्याने “बिर्याणीचं ३७० रुपयांचं बिल भरलंय, मग ते पैसे वसूल नको का करायला?” असं महिलेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे. हिमांशु जांग्राला नोकरीवरून देखील काढून टाकण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर सध्या मनोरंजनसृष्टीतून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने पोस्ट शेअर करत या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. तसेच, आपण कोणाला सोशल मीडिया स्टार बनवतोय…याचा आधी विचार करा, खरं मनोरंजन काय ते ओळखायला शिका असंही तिने नेटकऱ्यांना सांगितलं आहे.
अपूर्वा नेमळेकर लिहिते, “प्रणित मोरेच्या शोची सध्या सर्वत्र व्हायरल होत असलेली एक क्लिप मी पाहिली आणि खरंच सांगते, मला प्रचंड किळस आली, ती क्लिप अतिशय वाईट आहे. एक पुरुष भर कार्यक्रमात अभिमानाने सांगतो की, कशाप्रकारे त्याने आपल्या पार्टनरकडून डेटवर झालेल्या खर्चाची ‘वसुली’ करण्यासाठी विचित्र अपेक्षा ठेवली. हा माणूस हे सगळं बोलत असताना त्या शोमधील सगळे पुरुष त्याला हसून प्रतिसाद देत आहेत? हे नेमकं काय आहे? याला डार्क कॉमेडी म्हणत नाहीत! तो जे काही बोलत होतो ते अतिशय लज्जास्पद होतं…आणि हे सगळं सुरू असताना तिथे बसून हसणारे पुरुष हे या समाजावरचं ओझं आहेत.”
“आता आपण एक प्रेक्षक म्हणून सतर्क राहणं फार आवश्यक आहे. खरं मनोरंजन काय असतं…हे आपण अतिशय विचार करून समजून घेतलं पाहिजे. या अशा टॉक्सिक लोकांना मत मांडण्यासाठी रंगमंच उपलब्ध करून देणं आणि त्यांना सोशल मीडिया स्टार बनवणं आता थांबवा! त्यांच्यावर बंदी घाला!” अशी पोस्ट शेअर करत अपूर्वाने संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, ‘३७० रुपयांची बिर्याणी’ हा वाद वाढल्यावर हिमांशूने सोशल मीडियावर माफी मागून त्याचं अकाऊंट बंद केल्याची माहिती समोर आली आहे. यासह त्याला नोकरीवरून देखील काढून टाकण्यात आलं आहे. त्याच्या कंपनीच्या संस्थापकांनी व्हिडीओ शेअर करत त्याची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
