Savalyachi Janu Savali Fame Prapti Redkar : यंदाचा गणेशोत्सव कुणी गावी साजरा केला, तर मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी यंदा अनेक सार्वजनिक गणेश मंडळांना भेट दिल्याचं पाहायला मिळालं. ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राप्ती रेडकर दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त तिच्या गावी मालवणात जाते. मात्र, प्राप्ती ५-६ दिवस गावी राहून पुन्हा मुंबईत येते. कोकण आणि मुंबई या दोन्ही शहरांचा मेळ साधून प्राप्ती कशाप्रकारे गणेशोत्सव साजरा करते, हे जाणून घेऊयात…
प्राप्ती रेडकर म्हणते, “मी कोकणातली आहे. माझं गाव मालवणमध्ये वायंगणी येथे आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवासाठी मी गावी जाणार आहे. आमच्याकडे ११ दिवसांचा गणेशोत्सव असतो. मला सगळे दिवस गावी राहणं शक्य होत नाही, त्यामुळे मी गणेशोत्सवासाठी साधारण ५-६ दिवस गावी असते. यावर्षी मी आमच्या बाप्पासाठी ‘रेडकरांचा बाप्पा’ अशी नेमप्लेट बनवायला दिली होती. गावी गणपतीला खूप मजा असते. रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र भजन करतो. माझे काका सचिन रेडकर भजनी बुवा असल्यामुळे आमच्याकडे भरपूर धमाल असते. माझे बाबा सुद्धा गायक आहेत. त्यामुळे सगळं कुटुंब, आम्ही भावंडं मिळून भजनाचं भन्नाट जॅमिंग करतो.”

प्राप्ती पुढे म्हणाली, “गणेशोत्सव म्हटलं की माझ्या मनात सुंदर बाप्पा आणि गोड-गोड मोदक येतात. गावी गणपतीला गेल्यावर आमच्याकडे एक पद्धत आहे. अंघोळ झाल्यानंतर बाप्पासाठी अंगणातून किंवा रानातून ताज्या दुर्वा आणायच्या असतात. आम्ही त्याला ‘परडा’ म्हणतो. त्यात दुर्वांसोबत शमीची पानंही आणतो. त्यानंतर बाप्पाच्या पूजेची तयारी करतो. आरती करणं मला खूप आवडतं. मुंबईतल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठीही मी आतुर असते.”

“गावावरून आल्यावर मी सगळ्यात आधी ‘डोंगरीचा राजा’ आणि ‘उमरखाडीचा राजा’ या बाप्पाचं दर्शन घेते. त्यानंतर चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा, परळचा राजा आणि अजून बऱ्याच मोठ्या गणपतींचं मी दर्शन घेते. बाप्पाचं दर्शन, त्याच्या आशीर्वादाने मला खूप सकारात्मक वाटतं. बाप्पा नेहमीच आपल्या सगळ्यांना कठीण प्रसंगातून बाहेर काढतो, कारण तो विघ्नहर्ता आहे. माझ्या आयुष्यात, माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यात आलेल्या संकटांतून बाप्पाने नेहमी आम्हाला बाहेर काढलं आहे, असं मी मानते. बाप्पा माझ्या आयुष्यात खूपच स्पेशल आहे. एवढा की ते शब्दांत सांगणं कठीण आहे.”
