‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री प्राप्ती रेडकर सावलीची प्रमुख भूमिका साकारत आहे. नवरात्रीनिमित्त नुकताच तिने ‘स्त्रीशक्ती’कडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन सांगितला. नवरात्रीच्या निमित्ताने प्राप्तीने स्वसंरक्षणाचं महत्त्व आणि आपणच आपल्या स्वतःच्या आयुष्याची नायिका होण्याचा खास संदेश दिला आहे.

प्राप्ती म्हणाली, “मला या नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक महिला आणि मुलीला एवढाच संदेश द्यायचा आहे की, स्वतःची काळजी घ्या आणि काहीही झालं तरी खचून जाऊ नका. स्वतःसोबत काही चुकीचं घडत असेल, तर त्याचा विरोध करा आणि स्वतःसाठी हिंमतीने लढा. तुम्हाला हवं तसं जगा, तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण, असं जगा की तुम्हीच तुमच्या आयुष्याच्या मुख्य भूमिकेत आहात. तुमच्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्यांना घेऊ देऊ नका. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आयुष्याची नायिका बनावं आणि खंबीरपणे जगावं. सध्याचा काळ असा आहे की… कधी काय घडेल, याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीशक्तीविषयी बोलताना मला असं वाटतं की, प्रत्येक स्त्रीला संकटाच्या वेळी स्वतःला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे.”

प्राप्ती पुढे म्हणाली, “मी २०२२ पासून मार्शल आर्ट शिकतेय. सध्या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्यामुळे माझा सराव सुरू नाही पण, मार्शल आर्ट शिकण्याआधी आणि शिकल्यानंतर मला माझ्यात खूप फरक जाणवला. पूर्वी कधी माझ्याबरोबर कोणी जाणूनबुजून चुकीचं वागलं किंवा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला, तर मला खूप अस्वस्थ वाटायचं. त्यावेळी समोरच्याला विरोध करण्याचा किंवा त्याला काही बोलण्याचा आत्मविश्वास माझ्यात नव्हता. मात्र, मार्शल आर्ट शिकल्यानंतर माझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला.”

थेट त्या मुलाची कॉलर धरली…

“माझ्यातल्या स्त्रीशक्तीचा अनुभव मला एका प्रसंगातून आला. एकदा मालाड स्टेशनवर एका मुलाने मुद्दाम चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श केला. त्या वेळी तो कोण होता, हे माझ्या लक्षात आलं नाही पण नंतर तो पुन्हा त्याच हेतूने माझ्या दिशेने येताना दिसला. तेव्हा मी त्याची कॉलर पकडली आणि त्याला जोरदार विरोध केला. त्यानंतर तो माफी मागू लागला आणि तिथून पळून गेला. तो क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा होता, कारण तेव्हा मला माझ्यातली स्त्रीशक्ती जाणवली. म्हणूनच मी नेहमी सांगते की प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला निदान स्वतःचं संरक्षण करण्याइतकी तरी माहिती असायला हवी.”

“माझ्यासाठी नवरात्र हा केवळ देवीच्या आराधनेचा नव्हे तर आनंद, उत्साह आणि एकत्र येऊन सण साजरा करण्याचाही काळ आहे. माझ्या नानींच्या घराजवळच सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात लहान मुलांचे खेळ, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी विविध स्पर्धा, गरबा, फॅन्सी ड्रेस गरबा आणि पाककला स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. या सगळ्या कार्यक्रमांत सहभागी होताना आणि मित्रमंडळींसोबत धमाल करताना नवरात्रीचे दिवस कसे जातात, हे मला कळतही नाही. याशिवाय, विविध नवरात्र मंडळांकडून आलेल्या आमंत्रणांना प्रतिसाद देत मी आवर्जून दर्शनासाठीही जाते. या नऊ दिवसांत देवीच्या दर्शनातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि उत्सवातील उत्साह मला विशेष भावतो.” असं प्राप्तीने सांगितलं.