Prarthana Behere Emotional : २०२५ या वर्षात अनेक कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. अशा कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी कॅन्सरमुळे निधन झालं. तिच्या निधनाचं वृत्त कळताच अनेकांना धक्का बसला होता. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेसुद्धा तिच्या निधनानंतर कोलमडून गेली होती. प्रार्थनाने प्रियाबरोबरचं एक स्वप्न पाहिलेलं. पण, ते स्वप्न अपूर्णच राहिलं. याबद्दल प्रार्थनाने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
आरपारला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थना म्हणाली, “२०२५ हे वर्ष माझ्या आयुष्यातलं खूप वाईट वर्ष होतं. या वर्षाच्या सुरुवातीलाच माझा मामेभावाचं निधन झालं. त्याने मला खूप सपोर्ट केला आणि तोच गेला. त्यानंतर माझ्या मामीचं निधन झालं. मामी आणि माझं नातं खूपच घट्ट होतं. आईनंतर मी तिलाच माझी आई म्हणायची. तिला कॅन्सर होतं. त्यामुळे ती गेली. मग माझ्या पायाचं ऑपरेशन झालं. त्यात माझे चार-पाच महिने गेले. मला चालता येत नव्हतं. खूप त्रास होत होता आणि पायाच्या ऑपरेशनच्या दिवशीच माझी मामी गेली.”
२०२५ हे वर्ष माझ्यासाठी खूप वाईट होतं : प्रार्थना बेहेरे
यापुढे ती म्हणाली, “त्यातून थोडी बाहेर येतेय, इतक्यात प्रियाचं निधन झालं. ती माझी इंडस्ट्रीतली पहिलीच मैत्रीण. आम्ही दोघी एकत्र रूम शेअर केली होती. ती वारली आणि काही दिवसांतच माझे बाबा सोडून गेले. म्हणूनच २०२५ हे वर्ष माझ्यासाठी खूप वाईट होत असं मला वाटतं. या वर्षात माझी जवळची माणसं दूर गेली. म्हणूनच मला २०२५ ने खूप शिकवलं, त्याआधी मी खूप खुश असायचे. त्याआधी माझ्या आयुष्यात दु:ख आलंच नव्हतं. म्हणून मी सर्वांना कायम आनंदी रहा, असं म्हणायचे. पण आता दु:ख आलं ते अचानकच आलं. हे दु:ख इतकं होतं की, मला आनंदच नकोय, असं वाटत होतं. पण मी आता या दु:खाबरोबरच आयुष्य जगायला शिकलेय. मी नेहमीच खंबीर राहण्याचा प्रयत्न करते. कारण सगळे म्हणतात की, मी रडले तर मला सोडून गेलेल्या लोकांना त्रास होईल.”
प्रियाला अभिनेत्री म्हणून कास्ट करायचं होतं : प्रार्थना बेहेरे
यानंतर प्रार्थना प्रियाबरोबर पाहिलेल्या स्वप्नाबद्दल म्हणाली, “प्रियाबरोबर मी इतक्या गप्पा मारलेल्या आणि आम्ही दोघींनी एकत्र अनेक स्वप्नं पाहिली होती. मला एक चित्रपट दिग्दर्शित करायचा होता आणि त्यात प्रियाला अभिनेत्री म्हणून कास्ट करायचं होतं. ‘पवित्र रिश्ता’च्या वेळी मी तिला याबद्दल सांगितलं होतं. मध्यंतरी एकदा संधीही आली होती. तेव्हा तिच्या कॅन्सरबद्दल कळलं होतं. ती त्यातून बरी झाली होती. तेव्हा तिनं काम सुरू करायचं असं सांगितलं होतं. त्यानंतर तिला एक मालिका मिळाली आणि पुढे तिचं हे असं झालं. मी आईला पण सांगितलं की उद्या जाऊन मला कितीही मोठा पुरस्कार मिळाला तरी मी तेवढी आनंदी होणार नाही. जेवढी आनंदी मी आधी होते. कारण माझ्या जवळच्या सगळ्याच व्यक्ती, ज्यांना वाटत होतं की मी आयुष्यात काहीतरी करून दाखवावं ते सगळेच मला सोडून गेले.”
प्रिया म्हणालेली लोक मला विसरतायत का? : प्रार्थना बेहेरे
शेवटी प्रार्थना म्हणाली, “प्रिया वारल्यानंतर खूप लोकांना माझी मुलाखत घ्यायची होती. पण मी तेव्हा सर्वांना नाही म्हटलं. कारण तिचा आणि माझा बॉण्ड आम्हालाच माहिती होता. तेव्हा मी काय सांगू असं झालं होतं. लोकांना वाटेल की, प्रिया आता गेलीय आणि रडून दाखवतेय. तिचा मी एक अलिबागमधला फोटो पोस्ट केला होता. त्यावर खूप जणांनी लाईक्स, कमेंट्स केल्या होत्या. तेव्हा मला असं वाटलं की, ती हयात असताना जर लोकांनी हे केलं असतं तर तिला खूप आवडलं असतं. त्या काळात ती मला हे बोललीसुद्धा होती. मला आठवतंय ती मला म्हणालेली, प्रार्थना लोक मला विसरतायत का? मी काय करतेय हे लोकांना माहितीच नाहीय. कुणाला पडलेलीच नाहीय. माझे चाहत्यांनासुद्धा माझ्याबद्दल माहिती नाहीय. अशा खूप गोष्टी आहेत ज्या मला शेअर करायच्या आहेत. पण आता असं वाटतं की हे सांगून आता मला प्रसिद्धी नको आहे.”

