प्रार्थना बेहरे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थनाला ओळखले जाते. अनेक मालिका, चित्रपटातून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र, नाटकात काम करताना प्रार्थनाला कधीच पाहिलं नाही. अभिनेत्रीने नुकतीच ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनेलला हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला. या मु प्रार्थनाने नाटकांमध्ये काम न करण्यामागचं कारण सांगितलं आहे.
हेही वाचा- “विनोदी अभिनेता हा शिक्का…” भाऊ कदम यांचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाले “अनोळखी प्रेक्षकांनाही…”
प्रार्थना म्हणाली, ” मला नाटक नाही करायचं. मी ठरवून नाही म्हणते. मला नाटकाचे ऑफर येतात पण मी त्यांना नाही म्हणते. कारण मला नाटकांमध्ये किक नाही बसत. मला आनंद मिळत नाही. मी एक हिंदी नाटक केलं होतं. पण ते करताना मी नेहमी बेचैन असायचे आणि कधी ते एकदा संपतं असं मला व्हायचं. मला प्रत्येक काम आनंद घेत करायचं आहे. नाटकामध्ये असं होत नाही. त्यामुळे मी त्याला नाही म्हणते.”
प्रार्थनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने २०१८ मध्ये लग्न झाल्यावर काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. आता लवकरच प्रार्थना एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.