Prasad Jawade on Amruta Deshmukh: ‘पारू या मालिकेतून अभिनेता प्रसाद जवादेला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्याने आदित्य ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता पारूनंतर अभिनेता दीप ज्योती या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत काम करत आहे.

प्रसाद जवादेने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने डाएट, दिनचर्या, त्याच्या आहारात कोणते पदार्थ असतात, तसेच स्वयंपाकाची आवड या सगळ्याबद्दल वक्तव्य केले. तसेच, त्याला कोणते पदार्थ बनवता येतात, याबद्दलही त्याने सांगितले. नेमकं काय म्हणाला, हे जाणून घेऊ…

“मला स्वयंपाकाची आवड…”

प्रसाद या मुलाखतीत म्हणाला, “मला स्वयंपाकाची आवड खूप आधीपासून होती. मी सगळ्यात पहिल्यांदा पोहे केले होते. मम्मी म्हणाली होती की तू मस्त पोहे केले आहेस, तेव्हापासून मला एक आत्मविश्वास आला. त्यानंतर मी सतत पोहे बनवत असे. त्याच्याआधी मी मॅगी बनवायचो. मी मॅगी प्रेमी होतो. आधी दहा रुपयांची मॅगी, त्यानंतर ४० रुपयांचं मोठं पॅकेट इतकी मॅगी मी स्वत:साठी बनवायचो. दुपारी आई शाळेत जायची. तर मी आणि माझी बहीण घरी असायचो. तर आम्ही काहीतरी बनवत असायचो. गॅसजवळ जायची सवय लागली. इतर काही पदार्थ बनवायला लागलो. तेव्हापासून आवड निर्माण झाली.”

पुढे तो म्हणाला, “जेव्हा मला कळलं की अमृताचा आणि किचनचा साधारणत: ३६ चा आकडा आहे. तिला खरंच काही येत नाही. लॉकडाऊनपासून ती किचनचा ओटा वगैरे साफ करायला लागली, हे ती मान्य करेल. त्याच्याआधी ती किचनमध्ये फिरकतही नव्हती. अभिषेक उत्तम पदार्थ बनवतो. तर, आवड आणि अपरिहार्यता यामुळे हा घडलेला प्रवास आहे.”

अमृताला तू बनवलेले कोणते पदार्थ आवडतात? असे विचारले. त्यावर ती म्हणाली, “माझ्या हातचा पांढरा उपमा तिला प्रचंड आवडतो. आम्ही मद्रास कॅफेवरुन पोडी चटणी आणली आहे. उपमा, पोडी चटणी आणि तूप असं तिला खायला आवडतं. साधं-वरण भातही प्रचंड आवडतं. मी तिला कॉफी बनवलेली फार आवडते.”

दरम्यान, प्रसादने याच मुलाखतीत फिटनेसबद्दलही सांगितले. संध्याकाळी सातनंतर काही खाऊ नये, असे तो म्हणाला. याबरोबरच, त्याच्या आहारात काय असते, हेही त्याने सांगितले.