Prasad Jawade : अभिनेता प्रसाद जवादेने त्याच्या आईच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसह अभिनेत्याने काही आठवणीतले फोटोही शेअर केले आहेत. प्रसादच्या आई प्रज्ञा जवादे यांचं २८ डिसेंबर २०२५ रोजी निधन झालं, त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं महत्त्व सर्वाधिक असतं आणि प्रसादने सुद्धा आईच्या आजारपणात तिची संपूर्ण काळजी घेतली होती. आजही मम्मी तुझी खूप आठवण येते आणि ही आठवण उद्या-परवा कायम येत राहील असं म्हणत प्रसादने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रसाद जवादेची भावुक करणारी पोस्ट
मम्मी… काल घरी बाप्पाचं आगमन झालं आणि आज तुझा वाढदिवस…गणपतीचा सण किंवा कुठलाही सण म्हटलं की, घरातला तो आनंद, ती लगबग आणि सगळ्यांना प्रेमाने सांभाळणारी तू… हे सगळं आठवतंय. हे फोटो पाहताना कितीतरी आठवणी डोळ्यांसमोर येतात. माझं बालपण, तुझं माझ्यावरचं प्रेम, तू माझी घेतलेली काळजी… आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत स्वतःपेक्षा मला पुढे ठेवणारी तू.
तू किती प्रेमाने पुरणपोळी बनवायचीस. स्वतःची तब्येत ठीक नसतानाही, अंगात ताकद नसतानाही, सगळ्यांसाठी काहीतरी छान बनवायचीस… तुझी धडपड कधीच थांबली नाही.
कधी कधी अजूनही वाटतं, फोन करावा आणि म्हणावं,
“मम्मी, मी येतोय आज काय बनवलंयस?”
आणि तुझं नेहमीचं उत्तर ऐकावं…
“_ तुला आवडतं ना, म्हणून केलंय.”तुझी उणीव कधीच भरून निघणार नाही.
पण तू आम्हाला जे प्रेम दिलंस, ज्या आठवणी दिल्यास आणि जे संस्कार दिलेस, त्यांच्यासोबतच आम्ही पुढे चालत राहू.मम्मी, तुला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा!
जिथे कुठे असशील, तिथे आनंदी आणि शांत असशील, अशीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
आज तुझी खूप आठवण येतेय, मम्मी…
उद्या येईल, परवा येईल…तुझी आठवण कधीच कमी होणार नाही.आणि हो… तुझ्या हातची पुरणपोळी आजही तितकीच आठवते.
गणपती बाप्पा मोरया!
प्रसादच्या पोस्टवर त्याची पत्नी व अभिनेत्री अमृता देशमुखने, “मम्मी…वाढदिवसाच्या शुभेच्छा, मिस यू अ लॉट” अशी भावनिक कमेंट केली आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या प्रसाद ‘झी मराठी’च्या ‘दीप ज्योती’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री पूर्वा कौशिकने मुख्य भूमिका साकारली आहे.
