Prasad Jawade Fitness Secret: अभिनेता प्रसाद जवादे सध्या दीप-ज्योती मालिकेमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेत पूर्वा कौशिक प्रमुख भूमिकेत आहे. अभिनेत्याच्या मालिकेतील भूमिका लक्ष वेधून घेत असली तरी तो सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

राजश्री मराठीला अभिनेत्याने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या फिटनेसबद्दल, डाएट, दिनचर्या, आहारात कोणत्या गोष्टी असतात, तो स्वत: कोणते पदार्थ बनवतो, पत्नी अमृता काय मदत करते, अशा विविध गोष्टींबद्दल वक्तव्य केले. तो नेमकं काय म्हणाले, हे जाणून घेऊ…

“सूर्यास्ताच्या बरोबर आधी…”

प्रसाद जवादे म्हणाला, “पारू मालिकेत काम करत असताना मी आणि मालिकेचे डीओपी गणेश कोकरे, जे आता सनई चौघडे मालिकेचे शूटिंग करत आहेत, तर आम्ही दोघे डाएट करायचो. डाएट म्हणजे शूटिंगला सकाळी ९ वाजता जेव्हा जायचो, तेव्हा आम्ही जेवायचो. वरण, भात, भाजी पोळी जे असेल ते जेवायचो. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता, सूर्यास्ताच्या बरोबर आधी जेवण करायचो. सध्या हे अनेक जण करत आहेत. आम्हीही तेच करायचो. त्याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळाले. तर, आता मुंबईत आल्यानंतर त्या गोष्टी पाळणे होत नाही.”

पुढे तो म्हणाला, “मी कार्बोदके असलेले अन्नाचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे मी दुपारी नाचणीची भाकरी खातो. तर माझ्या घरचा कूक मीच आहे. अमृता मला डबा बांधून देते. किचन ओटा साफ करते, भांडी घासते. जेवण बनवण्याच्या संदर्भात ज्या गोष्टी असतात, ते मी करतो. नाचणीची भाकरी मला बनवता येत नाही, त्यामुळे मी ती ऑर्डर करतो.”

“९० टक्के माझा…”

दिनचर्या कशी असते, सकाळी उठल्यानंतर त्याच्या आहारात कोणते पदार्थ असतात? यावरही प्रसाद जवादेने खुलासा केला. तो म्हणाला, “सकाळी उठल्यानंतर मी चीज ऑम्लेट बनवतो. त्यानंतर कॉफी पितो. ब्लॅक कॉफीमध्ये मी नारळाचे तेल घालतो. बटर किंवा तूपही टाकू शकतो. पण, मी तेल टाकतो. जे मला डाएटिशन सांगतो किंवा ट्रेनर सांगतो, तेच मी फॉलो करतो. ब्लॅक कॉफी मला आधीही आवडत असे. त्यात तेल टाकून प्यायला सुरुवात केल्यानंतर मला ब्लॅक कॉफी अजून आवडायला लागली आहे. अमृताला आवडत नाही. त्याचा प्रचंड वाईट येतो. पण, मला आता त्याची सवय झाली आहे. ९० टक्के माझा तोच नाश्ता असतो. कधी कधी प्रवास वगैरे करताना वेगळे पदार्थ खाल्ले जातात.”

पुढे तो म्हणाला, “शूटिंग करत नसेल तर जीम करुन आल्यानंतर सलाद बनवतो. त्याबरोबर दुपारी भाकरी खातो. कधीतरी थोडासा ब्राऊन राईस करतो.त्याबरोबर, बीटरुट, काकडी जे उपलब्ध असेल ते खातो. मला बीटरुट खूप आवडतं. याबरोबरच, संध्याकाळी भूक लागल्यानंतर डाळिंबाचे दाणे खातो. याबरोबरच, दही आणि शेंगदाण्याची चटणी जेवणात असते. संध्याकाळी प्रोटीन शेक पितो किंवा मखाना खातो.”

आठवड्यातील तीन-चार दिवस असा आहार असतो. काही वेळा सातची शिफ्ट असते. तेव्हा मी ऑर्डर करतो. अमृताही वरण, नाचणीचा डोसा हे पदार्थ चांगले बनवते. आता मी ठरवलं आहे की चांगलं खायचं आहे. दोन पैसे जास्त द्यायला लागले तरी मी चांगलं खायचं हे ठरवलं आहे. कारण- काय स्थिती होते, हे मी अनुभवलं आहे.”

चांगले अन्न खाल्ले पाहिजे याची जाणीव कधी झाली? यावर तो म्हणाला, “सेटमुळे त्याची जाणीव झाली. कारण- प्रत्येक सेटवरील अन्न चांगलंच किंवा पौष्टिक असेल, हे गरजेचे नाही. ते कसं बनतं, काय बनतं हे तुम्हाला माहित नसतं. तर,मला तिथे जाणीव झाली. मला त्याबद्दल काही तक्रार नाही. कारण-सेटवरील जेवण सगळे खातात. पण मी ठरवलं की आपण सेटवरील खाऊ नकोयात. सेटवरचं खाल्ल्यामुळे मी जे काही झालो होतो, अजूनही असं काही फार फिट झालो नाहीये. पण प्रयत्नही तोच आहे की सेटवरचं खायचं नाही. घरातील खा नाहीतर जिथून चांगलं मिळतं, तिथून खा.

चाहत्यांना काय टीप देशील? यावर तो म्हणाला, “सकाळी तुम्ही काय खाता, यापेक्षा संध्याकाळी तुम्ही काय खाता, ते खूप जास्त महत्वाचं आहे आणि सातनंतर काय खाता, हेही महत्वाचं आहे. सातनंतर तुम्ही काहीच खाल्लं नाही पाहिजे. झोपायच्या आधी किमान तीन तास पोट रिकामं असावं किंवा खाल्लेल्या अन्नाचे पचन झाले पाहिजे. त्याचा खूप फरक जाणवतो. दुपारी जर तुम्ही चपाती किंवा भात खाल्ला, तर रात्री ते खाणं टाळा. कार्बोदके टाळली तर फरक पडू शकतो. मी काही ट्रेनर नाहीये, त्यामुळे मी सांगितलं आहे, म्हणून ते आहे तसं फॉलो करू नका. बरेच जण हे सांगू शकतात. एकदा करून बघायला हरकत नाहीये.”

टीप: प्रसाद जवादे आणि इतर अनेक कलाकार त्यांच्या दिनचर्या, डाएट व इतर गोष्टींबद्दल सांगतात. मात्र, प्रत्येकाच्या आरोग्यानुसार वेगवेगळ्या गोष्टी लागू होतात. त्यामुळे, तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारात बदल किंवा डाएट फॉलो करू शकता.