Sanai Chaughade upcoming twist: ‘सनई चौघडे’ मालिकेत सध्या नवीन वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत नुकताच आसावरीच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळाला. आसावरी व गौतम बांदेकरचे लग्न ठरले होते. मात्र, तो खोटारडा होता. त्याचे आधीच लग्न झाले होते. त्याने याधीही अनेक मुलींना फसवले होते. दुसरीकडे आसावरी गौतम खानोलकरच्या प्रेमात पडली. दोघे एकमेकांच्या प्रेमात असतानासुद्धा आसावरी घरच्यांनी बघितलेल्या मुलाशी लग्न करायला तयार झाली. कारण- आसावरीचे आई-वडील बऱ्याच दिवसांपासून तिच्या लग्नाची वाट बघत होते.

आसावरीला आई-वडिलांना दुखवायचे नव्हते म्हणून ती लग्नासाठी तयार झाली. जेव्हा गौतमचा भाऊ जय व आसावरीची बहीण शर्वरी यांना त्यांच्या प्रेमाबद्दल माहीत झाले, तेव्हा त्यांनी आसावरी व गौतम बांदेकरचे लग्न मोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. शेवटी भरलग्नात त्यांनी गौतम बांदेकरचे सत्य सर्वांसमोर आणले आणि हे लग्न मोडले. त्यावेळी सर्वांना गौतम खानोलकर व आसावरी एकमेकांच्या प्रेमात असल्याचे सर्वांना समजले. त्या सगळ्याचा परब कुटुंबाला धक्का बसला. शर्वरी, आसावरीच्या आईला पमाला हृदयविकाराचा झटका बसला. पत्नी पमाची अवस्था पाहून वडील मुलींवर रागावले. मुलींना इतक्या प्रेमाने वाढवूनही त्यांनी धोका दिला, असे त्यांना वाटले. त्यांच्यात दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे.

‘सनई चौघडे’मध्ये ट्विस्ट, नेमकं काय घडणार?

आता झी मराठी वाहिनीने सनई चौघडे या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, गायक प्रथमेश लघाटेचा एक कार्यक्रम सुरू आहे. तिथे परब कुटुंब आले आहे. शर्वरी व आसावरी यांच्यावर अजूनही त्यांच्या वडिलांचा राग आहे. तिथे जय खानोलकरही येतो. तो शर्वरीच्या वडिलांना म्हणतो, “तुमच्या मुलींचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्रत्येक क्षणाला माझे मम्मी-पप्पा, त्यांना काय वाटेल, त्यांची प्रतिक्रिया काय असेल, हा एकच विचार शर्वरीच्या मनात होता.”

पुढे तो म्हणतो, “आसावरी तर तिचं लग्न लागत असतानासुद्धा तुमच्या शब्दाबाहेर नव्हती. अशी मुलं मिळायला भाग्य लागतं.” जयचे बोलणे ऐकून आसावरी व शर्वरीचे वडील त्यांच्याजवळ येतात. त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात. त्यानंतर संपूर्ण परब कुटुंब भावुक होते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘प्रथमेशचे सूर आणि जयचा समजूतदारपणा परब कुटुंबाला जवळ आणणार’, अशी कॅप्शन दिली आहे. प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. “खूप मस्त”, “खूप छान मालिका आहे”, “खूप छान”, “जय व शरूचे सीन छान वाटतात”, अशा अनेक कमेंट्स करीत कौतुक केले आहे. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.

दरम्यान, आता आसावरी व गौतम यांचे नाते कोणते नवीन वळण येणार, त्यामुळे परब कुटुंब व खानोलकर कुटुंब यांच्यात कसे नाते तयार, काय ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.