Prathamesh Parab on Samir Choughule: समीर चौघुले यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आजपर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्याबरोबरच ते सम्या सम्या मैफलीत माझ्या या कार्यक्रमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांच्या कार्यक्रमांना प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात.

आता लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परबने समीर चौघुलेंच्या या कार्यक्रमाला नुकतीच हजेरी लावली होती. कार्यक्रमानंतर अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत कार्यक्रमाबद्दल आणि समीर चौघुलेंबद्दल वक्तव्य केले आहे.

“आज इतक्या वर्षांनी ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ हा अडीच तासांचा…”

प्रथमेशने लिहिले, “इतके हसलोय अरे, पण खरं सांगू, हा अडीच तासांचा परफॉर्मन्स बघताना हसण्यापेक्षा अभिमानानं रडायला जास्त येत होतं. समीरदादाबरोबर माझं एक वेगळंच कनेक्शन आहे. आम्ही डहाणूकर कॉलेजला जायचो, तेव्हा आमचे शिक्षक नेहमी सांगायचे की, समीर चौघुले, पुष्कर श्रोत्र, अनिकेत विश्वासराव हे डहाणूकरचे स्टार आहेत. जबरदस्त काम करायचे. अनेकदा त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा हा पुरस्कार मिळलाय.”

प्रथमेशने समीर चौगुलेंबरोबर काम केल्याची आठवण सांगत लिहिले, “तेव्हा आम्ही त्यांच्याबद्दल ऐकायचो, त्यांचं काम बघायचो आणि नंतर मला समीरदादाबरोबर ‘बिनधास्त पाहा’ हे नाटक करायला मिळालं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यातला तो काठीचा सीन, आम्ही तो प्रेक्षकांमध्ये बसून नाही, तर विंगमध्ये उभं राहून बघायचो. समीरदादा तो सीन परफॉर्म करायचा आणि आम्ही बाजूला उभं राहून अक्षरशः त्याचा आनंद घ्यायचो आणि त्याच वेळी खूप काही शिकायचो. आज इतक्या वर्षांनी ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ हा अडीच तासांचा परफॉर्मन्स बघताना त्या सगळ्या आठवणी पुन्हा डोळ्यांसमोर आल्या.”

“गेली २५–३० वर्षे हा माणूस…”

समीर चौगुलेंचे कौतुक करीत प्रथमेशने पुढे लिहिले, “गेली २५–३० वर्षं हा माणूस विनोद निर्माण करतोय, लिहितोय, परफॉर्म करतोय आणि त्या सगळ्या वर्षांची मेहनत आज त्यांच्या सहजतेत दिसते. त्यांचं काम बघताना फक्त हसू येत नाही, तर एका कलाकारानं स्वतःला इतकी वर्षं घडवत नेलंय, याचा अभिमानही वाटतो. आपण जेव्हा सुरुवात करतो, तेव्हा काही नावं आपल्या डोळ्यांसमोर असतात. आपण त्यांच्याबरोबर काम केलेलं नसतं; पण त्यांचा प्रवास कुठेतरी आपल्याला प्रेरित करीत असतो. समीरदादा माझ्यासाठी त्यातलं एक नाव आहे.”

“काल प्रेक्षक म्हणून खूप…”

शेवटी त्यानं, “सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो आपल्या डहाणूकरचा आहे. काल प्रेक्षक म्हणून खूप हसलो; पण आतून एकच भावना होती की, हा आपला माणूस आहे आणि किती भारी काम करतोय. समीरदादा, खूप प्रेम, खूप आदर आणि खूप अभिमान. असंच काम करीत राहा आणि आम्हाला प्रेरित करत राहा. डहाणूकरचा आमचा सुपरस्टार आहे. फोटो काढताना सगळे त्याला म्हणत होते की, तू सेंटरला उभा राहा; पण दादाला मात्र माझ्याच बाजूला उभं राहायचं होतं. खूप प्रेम”, असे लिहीत प्रेम व्यक्त केले.

प्रथमेशच्या या पोस्टवर समीर चौगुलेंनी कमेंट करीत, “काय बोलू, खूप प्रेम पप्या..मित्रा”, असे लिहिले. याबरोबरच, अनेक कलाकारांनीही कमेंट्स करीत समीर चौगुलेंचे, तसेच प्रथमेशचे कौतुक केले आहे.