Star Pravah Premachi Goshta Serial : तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सर्वत्र चर्चेत आली होती. तेजश्रीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने तिने ही मालिका सोडल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’चा टीआरपी सुद्धा कमी झाला. परिणामी, मालिकेची वेळ वाहिनीकडून बदलण्यात आली आहे. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्याचं वृत्त समोर आलं आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं कथानक रंजक वळणावर असतानाच यामधून एका लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे. या मालिकेत स्वातीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कोमल सोमारे-गजमल हिने अलीकडेच या मालिकेला रामराम केला आहे. स्वाती ही सागर कोळीची बहीण असते. कोमलने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती.

आता कोमलने शो सोडल्यावर तिच्या जागी मालिकेत कोणाची वर्णी लागणार, सागर कोळीच्या बहिणीची भूमिका कोण साकारणार असे बरेच प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले होते. अखेर स्वाती कोळीच्या भूमिकेत झळकणाऱ्या नव्या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत कोमलची रिप्लेसमेंट म्हणून अभिनेत्री नम्रता सुमिराज एन्ट्री घेणार आहे. नम्रताने यापूर्वी ‘स्टार प्रवाह’च्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता प्रेक्षकांना नम्रता सुमिराज स्वाती कोळीची भूमिका साकारताना दिसेल.

“स्वाती ही भूमिका प्रेम आणि कृतज्ञतेने मी पुढे नेतेय…तुमचं प्रेम असंच कायम ठेवा आणि मला आशीर्वाद द्या…पाहत राहा ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका” अशी पोस्ट शेअर करत नम्रताने तिच्या नव्या भूमिकेबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. सध्या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका दुपारी १ वाजता प्रसारित केली जाते. या मालिकेत स्वरदा ठिगळे, राज हंचनाळे, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव, इरा परवडे, अमृता बने, अनिरुद्ध हरीप हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.