Premachi Goshta Serial Off Air : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. ५ जुलैला या मालिकेचा अखेरचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘प्रेमाची गोष्ट’ संपल्यावर या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचं पाहायला मिळालं.
आता या मालिकेतील बालकलाकार इराने देखील खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इरा लहान असल्याने तिच्या वतीने सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या पालकांनी पोस्ट शेअर केली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत इराने ‘सई’ हे पात्र साकारलं होतं. या मालिकेचं संपूर्ण कथानक सई, मुक्ता आणि सागर यांच्याभोवती फिरलं. मुळात मुक्ता आणि सागरचं लग्नच सईमुळे झालेलं असतं. त्यामुळे मालिका संपल्यावर सईची भूमिका साकारणाऱ्या इराला देखील खूप वाईट वाटलं.
इरा म्हणते, “प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने माझं स्वप्र पूर्ण केलं. कलाकार म्हणून ओळख दिली याचं संपूर्ण श्रेय शशी-सुमीत प्रोडक्शन आणि स्टार प्रवाह तसेच सतिश राजवाडे यांचं आहे. त्यांनी सई या पात्रासाठी मला संधी दिली त्याबद्दल मनापासून सर्वांचे खूप खूप आभार, Thank you… प्रेक्षकांसमोर आज ( ५ जुलै ) या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा शूटिंगचा शेवटचा दिवस होता तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं. कारण, मी जेव्हा जेव्हा सेटवर असायची तेव्हा मला शूटिंग करायला खूप मजा येत होती. तेव्हा मी खेळायचे, मजा करायचे. सई या पात्राने मला कलाकार म्हणून खूप काही शिकवलं, सर्वांनी खूप प्रेम दिलं. मी सई हे पात्र कधीच विसरू शकणार नाही. I love you सई…”
“स्वरदा ठिगळे, अपूर्वा नेमळेकर, राज हंचनाळे, संजीवनी जाधव, आयुष भिडे, नम्रता सुमिराज, अमृता बने या सर्वांसह काम करायला खूप मजा आली आणि त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद नेहमी असेच भरभरून प्रेम राहू दे. आता मालिकेचा निरोप घेण्याची वेळ आलीये…Bye” अशी पोस्ट शेअर करत इराने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सईच्या या पोस्टवर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने, “लव्ह यू बेटा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका संपल्यावर आता ‘स्टार प्रवाह’वर त्याऐवजी ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर प्रमुख भूमिका साकारत आहेत.