Priyadarshan Jadhav Emotional Post: अभिनेता प्रियदर्शन जाधव हा ‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गँगवॉर’ या शोमध्ये दिसला होता. तो अभिनयाबरोबरच लेखक म्हणूनही लोकप्रिय आहे. तो टेलिव्हिजनबरोबरच चित्रपट आणि नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

“झोप येत नाही, राग अनावर …”

आता अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले, “गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून मी तणाव, चिंता या सगळ्याला सामोरे जात आहे. थोडी नैराश्याची भावना आहे. कामामुळे पूर्णपणे थकल्यासारखे वाटत आहे. नवीन चित्रपट नाहीत, नाटकं नाहीत किंवा टेलिव्हिजनवर नवीन काही काम केलं नाही. नाटक लिहिले नाही. चित्रपट लिहिले नाहीत. कामात लक्ष केंद्रित करता येत नाही.”

“जे प्रोजेक्ट आहेत ते उशिरा सुरू होत आहेत. काहींचा प्रदर्शनात विलंब होत आहे. मी लोकांपासून लांब पळत आहे. एकाच वेळी खूप आनंदी आणि असुरक्षित वाटते. खूप लवकर राग येतो, काहीच ध्येय नसते, अनेकदा झोपही लागत नाही”, असे लिहित अभिनेत्याने गेले सहा महिने कठीण गेल्याचे लिहिले.

“२०३ डॉलर्सची कमाई…”

पुढे त्याने लिहिले, “या सगळ्या गोंधळात अमेरिकेचा दौरा एकप्रकारे माझ्यासाठी आशीर्वाद ठरला. हा फोटो लास वेगास (Las Vegas)मध्ये काढलेला आहे. मी संपूर्ण रात्र कॅसिनोमध्ये जागाच होतो, नशीब आजमावत होतो आणि आश्चर्य म्हणजे मी २०३ डॉलर्स जिंकले. ते पैसे घेतले आणि आम्ही सगळे मिळून अ‍ॅरिझोनाच्या ग्रँड कॅनियनला गेलो आणि खूप छान वेळ घालवला.”

“अस्थिर काळात कधी कधी विनोद अशक्यालाही जिंकू शकतो. प्रेम कोणत्याही संकटातून तुम्हाला बाहेर काढू शकते. वाईट नशीब आवाज करते, पण शहाणपणाला शांतपणे माघार कधी घ्यायची हे माहीत असते. मला आशा आहे की सर्व काही ठीक होईल”, असे म्हणत हा फोटो अमेरिकेतील असल्याचे अभिनेत्याने सांगितले. तसेच परिस्थिती अजून चांगली होईल, असेही तो म्हणाला.

श्रेया बुगडेसह ‘या’ कलाकारांनी केल्या कमेंट्स

आता प्रियदर्शनने त्याच्या कठीण काळाबद्दल भावना व्यक्त केल्यानंतर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. क्षितिज दातेने लिहिले, “खूप घट्ट मिठी, तू कमाल आहेस भाई”, असे लिहिले; तर श्रेया बुगडेने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत, तर दिप्ती लेलेने हार्ट इमोजी शेअर केली आहे.

एका चाहत्याने लिहिले, “हे सगळं इतक्या प्रामाणिकपणे शेअर केल्याबद्दल तुझा खूप अभिमान वाटतो. कठीण काळ कायम राहत नाही, पण मजबूत माणसं टिकून राहतात.”

आता अभिनेता आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.