Priyadarshan Jadhav Shares Anecdote: प्रियदर्शन जाधव हा अभिनय, दिग्दर्शन या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. तसेच तो नाटकाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट लक्ष वेधून घेतात. आता अभिनेत्याचे एका मुलाखतीतील वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. प्रियदर्शन जाधव व त्याची पत्नी वैभवी गुप्ते जाधव यांनी द अनुरुप शो या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से सांगितले. काही गमती जमती सांगितल्या.

या मुलाखतीत या जोडप्याने त्यांची लव्हस्टोरी सांगितली. तसेच प्रियदर्शनने प्रपोज केलं होतं, तेव्हा तीन-चार महिन्यांनंतर वैभवी यांनी उत्तर दिल्याचा खुलासा केला.

प्रियदर्शन जाधवने एक किस्सादेखील सांगितला. तो म्हणाला, “लग्नानंतर आम्ही मुंबईत आलो. लग्नानंतर १५-२० दिवसांनी मी आईला व वैभवीला घरात कोंडून निघून गेलो.”

यावर सविस्तरपणे सांगत वैभवी म्हणाल्या, “प्रियदर्शनला एकटं राहण्याची सवय होती, त्यामुळे तो प्रकार घडला होता. त्याची आई आली होती, आम्हा दोघींना कुठेतरी बाहेर जायचं होतं. तो त्याच्या प्रयोगासाठी निघाला, त्यावेळी आम्ही आतल्या खोलीत होतो. तो बाहेरून कुलूप घालून निघून गेला, त्यानंतर आम्ही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या लक्षात आलं. त्याला फोन केला, तोपर्यंत तो विक्रोळीपर्यंत पोहोचला होता. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहत होतो. त्या इमारतीला लिफ्ट नव्हती. शेजारच्या काकांना फोन केला. ते तीन मजले खाली उतरून गेले. आम्ही खिडकीतून घरात असलेली चावी टाकली. ते पुन्हा तीन मजले चढून वर आले आणि त्यांनी कुलूप उघडलं.”

पुढे वैभवी म्हणाल्या, “हा एक किस्सा झाला. पण, जेव्हा आमच्या मुलीचा ईराचा जन्म झाला होता, त्यानंतर ईरा आणि आईला एकदा तसंच कोंडून ठेवलं होतं.” त्या असेही म्हणाल्या की, त्याला विसरण्याची सवय आहे, तो काही ना काही विसरतो.

अभिनेत्याने असेही सांगितले की, लग्नानंतर भाड्याच्या घरात राहत होतो, त्यानंतर स्वत:चं घर घेतलं. लग्नाआधी वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घरात मी राहिलो. दोन ठिकाणी चोरी झाली, त्यानंतर मला त्याचा त्रास झाला. आपण नसताना कोणीतरी आपलं घर फोडून इथे येऊन गेलं आहे याचा धक्का बसला होता. त्यानंतर काही दिवस मी आई-वडिलांकडे राहण्यासाठी गेलो होतो.

वैभवी म्हणाल्या की, लग्नानंतर २३ व्या वर्षी घराची जबाबदारी आली, पण प्रियदर्शनच्या काही अपेक्षा नव्हत्या, त्यामुळे दडपण नव्हते. दरम्यान, प्रियदर्शन व वैभवी यांच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत.