Manva Naik On Delaying Payments : प्रॉडक्शन हाऊसेसनी कलाकारांचे पैसे बुडवणं, शूटिंग संपल्यानंतरही त्यांना पैसे न देणं हा प्रकार मनोरंजन सृष्टीत अनेकदा घडताना दिसतो. यावरून अनेक मराठी कलाकारांनी पुढे येत आवाज उठवला आहे. सोशल मिडियाद्वारे त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे.

काही दिवसांपूर्वी मराठी दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी ५ लाख रुपये थकवल्याचा आरोप शशांक केतकरने केला होता. तसंच शंतनू गंगणेनेसुद्धा अशा कलाकारांच्या थकीत पैशांबद्दल प्रयत्न केले होते. निर्माते आणि कलाकारांच्या थकीत पैशांबद्दल अनेकांनी त्यांच्या त्यांच्या बाजू मांडल्या आहेत. अशातच निर्माती मनवा नाईकनेसुद्धा याप्रकरणी स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे.

यात खरंतर खूप प्रॉब्लेम आहेत : मनवा नाईक

अमोल परचुरे यांना दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “चॅनेल्स अगदी कॉर्पोरेट पद्धतीने काम करतात. कलाकारांबरोबरच्या डील्स या ९० दिवसांच्याच असतात. यात खरंतर खूप प्रॉब्लेम आहेत. एक आहे, निर्मात्याची नियत – पैसे द्यायचे आहेत की नाही. दुसरं म्हणजे, त्याचे प्रॉब्लेम्स. आपण केलेल्या प्लॅननुसार सगळं झालंय का? तिसरं आहे, काही अचानक आलेले प्रसंगं, ज्यामुळे त्याने केलेल्या प्लॅन्सनुसार गोष्टी घडल्या नाहीत. चौथं म्हणजे जीएसटी, टीडीएस भरले की नाही. याबद्दल एका गोष्टीवरून सांगू शकत नाही. यात अनेक प्रॉब्लेम्स असतात. इंडस्ट्रीत असेही निर्माते आहेत, जे अगदी चोख व्यवहार करतात. वेळच्या वेळी पैसे देतात आणि यासाठी ते इंडस्ट्रीत जाणले जातात. मग यांना ९० दिवसांचा प्रॉब्लेम नसतो का? माझं म्हणणं आहे की जेवढी स्क्रिप्ट (संहिता) महत्त्वाची आहे, तेवढीच एक्सल शीटसुद्धा महत्त्वाची आहे. पहिल्याच दिवशी एक्सल शीट नीट बनली नाही, तर ती कधीच बनत नाही. मग तोटा कसा भरून काढायचा हा प्रश्न निर्माण होतो. माझ्याबरोबरसुद्धा हे झालं आहे, माझ्याही एक्सल शीट अनेकदा चुकल्या आहेत. पण हे एक सतत शिकण्याचं काम आहे.”

तुमचे जेवढे पैसे आहेत, तेवढेच घ्या : मनवा नाईक

यानंतर मनवा म्हणाली, “मी निर्माती झाल्यानंतर राकेश सारंगने मला फोन करून सांगितलं होतं की, एकूण १०० रुपयांमधले आपले फक्त १० रुपयेच असतात. तेवढेच आपण घ्यायचे आणि उरलेले आपण द्यायचे असतात. हे माझ्या डोक्यात अगदी फिट बसलं आहे. तुमचे जेवढे पैसे आहेत, तेवढेच तुम्ही घ्या. समोरच्याला ९० दिवसांनी द्यायचे आहेत, त्यामुळे इथले पैसे तिथे द्यायचे. इथले तिथे द्यायचे… असं करायचं नाही. खूप प्रॉब्लेम असतात.”

ऐनवेळी येणारे प्रॉब्लेम्स असतात : मनवा नाईक

शेवटी ती म्हणाली, “मी एकट्या निर्मात्यांना दोष देणार नाही. शो ऑन-एअर जाणार असतो. ठरलेल्या दिवसांमध्ये शूटिंग होत नाही. अनेकदा तारखांचे प्रॉब्लेम असतात. आज जे ठरवलं आहे, ते होत नाही. मग ते उद्यावर जातं. मग प्रत्येक गोष्टीची किंमत वाढते. असे काही ऐनवेळी येणारे प्रॉब्लेम्सदेखील असतात. यात कुठे निर्माता दबला जाईल, हे सांगता येत नाही. हे माझ्याबद्दलही झालं होतं. माझंही नुकसान झालं आहे. पण यातून बाहेर येण्याचा मार्ग काढणं महत्त्वाचं आहे.”