Puja Banerjee reveals baby girl name Maishaa : लोकप्रिय टीव्ही मालिका ‘देवों के देव… महादेव’ मध्ये पार्वती साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली. पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांना आधी एक मुलगा होता आणि आता त्यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं. मुलगी सव्वा महिन्यांची झाल्यावर पूजा व कुणाल यांनी तिचं नाव जाहीर केलं आहे. तसेच व्हिडीओ शेअर करून नामकरण सोहळ्याची झलकही दाखवली आहे.
पूजा बॅनर्जीने ३९ व्या वर्षी १५ ऑगस्ट २०२६ रोजी मुलीला जन्म दिला आणि तिचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं. आता तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून मुलीचं नाव सांगितलं आहे. पारंपरिक पद्धतीने तिच्या लेकीचा नामकरण सोहळा पार पडला. पूजा व कुणाल यांनी मुलीचं नाव ‘मायशा’ ठेवलं आहे.
‘नामकरण संस्कार, आमची मुलगी मायशा’ अशा आशयाचं कॅप्शन देत पूजाने व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत नामकरण सोहळ्यातील काही खास क्षण पाहायला मिळतात. पूजाने लेक मायशाला जवळ घेतलंय. त्याचबरोबर तिचा मुलगा व पतीही फोटोत दिसत आहेत.
पाहा पूजा बॅनर्जीने शेअर केलेला व्हिडीओ
अदा खान, नविना, विनी अरोरा, रोहित पुरोहितसह अनेक कलाकारांनी या व्हिडीओवर कमेंट्स करून छोट्या मायशावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, पूजा बॅनर्जी आणि अभिनेता कुणाल वर्मा यांची पहिली भेट २००८ मध्ये स्टार प्लसवरील ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. मालिकेत काम करता करता दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तब्बल ९ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. काही काळ मतभेदांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले, पण ते पुन्हा एकत्र आले.
मार्च २०२० मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज केले. १५ एप्रिल २०२० रोजी ते पारंपरिक पद्धतीने लग्न करणार होते पण लॉकडाउनमुळे लग्न सोहळा रद्द झाला. कोर्ट मॅरेज झाल्यानंतर काही महिन्यांतच, म्हणजेच ९ ऑक्टोबर २०२० रोजी पूजा आणि कुणालच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले. पूजाने एका मुलाला जन्म दिला, त्याचं नाव त्यांनी क्रिशिव ठेवलंय. आता पूजा व कुणाल यांच्या घरी मुलीचं आगमन झालं असून त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालंय.
