Puja Banerjee-Kunal Verma welcome baby girl: ‘देवों के देव… महादेव’ या मालिकेतून अभिनेत्री पूजा बॅनर्जीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

पूजा बॅनर्जी दुसऱ्यांदा झाली आई

पूजाने नुकताच मुलीला जन्म दिला. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. पूजाने एक छोटासा व्हिडीओ शेअर करत मुलीची झलक दाखविली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, “माझ्या मुलीची पहिली झलक”, असे पूजाने लिहिले. हा व्हिडीओ शेअर करत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. तसेच, संपूर्ण प्रवास थोडक्यात सांगितला.

पूजा आणि कुणालने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या मुलीच्या जन्मानंतरचे काही खास क्षण पाहायला मिळत आहेत. जेव्हा नर्सने त्यांना त्यांच्या मुलीच्या जन्माबद्दल सांगितले, तेव्हा संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. या व्हिडिओमध्ये त्यांचा मोठा मुलगा त्याच्या लहान बहिणीला पहिल्यांदा भेटतानाही दिसत आहे. या जोडप्याने त्यांच्या मुलीच्या जन्माबद्दल सांगताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. मनोरंजन क्षेत्रातीला इतर कलाकारांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

एप्रिल २०२६ मध्ये या जोडप्याने एका यूट्यूब व्हिडिओद्वारे प्रेग्नंसीबद्दल सांगितले होते. अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्यांदा गरोदर असल्याचे सांगत तिचा आनंद व्यक्त केला. तसेच, तिने तिच्या इन्स्टाग्रावरही व्हिडीओ शेअर करत याबद्दल सांगितले होते. अभिनेत्रीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. तसेच, “आतापर्यंतची सगळ्यात चांगली बातमी”, “तुम्हा दोघांसाठी खूप आनंद झाला” आणि “तुमचा मुलगा सर्वात गोड भाऊ होईल” यांसारख्या कमेंट्स करत जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता.

ऑक्टोबर २०२० मध्ये पूजा व कुणाल यांना मुलगा झाला होता. आता मुलीच्या जन्मानंतर ते दोन मुलांचे पालक झाले आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करतात.

पूजा व कुणाल यांच्या कामाबद्दल बोलायचे तर, पूजाने ‘देवों के देव…महादेव’ आणि ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. हे दोन्ही शो प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. कुणालनेही ‘तुज संग प्रीत लगाई सजना’, ‘हवन’, ‘देवों के देव…महादेव’ आणि ‘दिल से दिल तक’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. लग्नाआधी त्यांनी सहकलाकार म्हणून एकत्र काम केले आहे.

दरम्यान, पूजा आता तिच्या मुलीचे काय नाव ठेवणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.