प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री पूजा बॅनर्जी ३९ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ फेम पूजाने तिच्या एका व्लॉगमध्ये ही आनंदाची बातमी दिली. पूजा आणि तिचा पती कुणाल वर्मा लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत. या जोडप्याचा आधीच एक मुलगा आहे. अवघ्या १५ व्या वर्षी प्रेमासाठी घरून पळून गेलेल्या पूजाचा पहिला विवाह अपयशी ठरला होता, पण आता ती कुणाल वर्मासोबत आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्माची आतुरतेने वाट पाहतेय.
‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली पूजा आणि कुणाल सध्या खूप आनंदात असून आपल्या दुसऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पूजाने युट्यूबवर ‘सरप्राइज’ नावाने एक व्लॉग शेअर करून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्याचबरोबर, तिने इन्स्टाग्रामवरही एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने गर्भधारणेदरम्यान उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर सविस्तर चर्चा केली आहे.
इन्स्टाग्रामवरील एका छोट्या व्हिडीओमध्ये पूजाने आपली प्रेग्नन्सी टेस्टिंग किट दाखवत ही अधिकृत घोषणा केली. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिने आपला बेबी बंप देखील फ्लॉन्ट केला. यावेळी पूजाने गरोदरपणात होणाऱ्या ‘मूड स्विंग्स’बद्दल सागितलं. पण यावर तिच्याकडे उपाय आहे. तिचा मोठा मुलगा या काळात तिच्यावर खूप प्रेम करतोय, असं तिने सांगितलं.
पूजा बॅनर्जीने पळून जाऊन केलं होतं पहिलं लग्न
पूजा बॅनर्जी वयाच्या १५ व्या वर्षी घरातून पळून गेली होती. तिने २००४ मध्ये तिचा प्रियकर अरुणॉय चक्रवर्ती याच्याशी लग्न केलं. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि २०१३ मध्ये त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. पहिल्या लग्नातील दुःख विसरून पूजाने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. ‘देवों के देव महादेव’ मालिकेत तिने साकारलेली ‘देवी पार्वतीची’ भूमिका प्रचंड गाजली आणि तिला मोठी लोकप्रियता मिळाली.
पूजा बॅनर्जीचं दुसरं लग्न आणि मुलगा
नंतर पूजाची भेट टीव्ही अभिनेता कुणाल वर्माशी झाली. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०२० मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होते आणि त्याच वर्षी पूजाने मुलाला जन्म दिला. त्यानंतर २०२१ मध्ये गोव्यात त्यांनी लग्न केलं. या जोडप्याच्या मुलाचे नाव क्रिशिव वर्मा असं आहे. आता पूजा पुन्हा गरोदर आहे. लवकरच ती तिच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करेल.
पूजा बॅनर्जीचं करिअर
पूजा बॅनर्जीने २००८ मध्ये ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ या मालिकेत ‘वृंदा’ची भूमिका साकारून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली. तिने ‘सर्वगुण संपन्न’, ‘देवों के देव… महादेव’, ‘कुबूल है’ आणि ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. २०११ मध्ये तेलगू चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि त्यानंतर अनेक बंगाली चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या केला. याशिवाय ती ‘झलक दिखला जा ७’ (२०१४) आणि ‘बिग बॉस बांग्ला’ सारख्या रिॲलिटी शोजमध्येही झळकली होती.
