Punam Chandorkar Actress journey : इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे आधी या क्षेत्रात नव्हते पण, कालंतराने ते या क्षेत्रात आले आणि त्यांनी मनोरंजन विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. याचसह असेही काही कलाकार आहेत जे अभिनयासह इतरही क्षेत्रात सक्रिय आहेत. यापैकीच एक म्हणजे ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री पूनम चांदोरकर.
पूनम चांदोरकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयासह ती शिक्षिका, निवेदिका आणि टॅरोट रिडरसुद्धा आहे. पण, तिचा हा प्रवास अनेक आव्हानांनी भरलेला आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे. शिक्षिका असलेली पूनम अभिनय क्षेत्रात कशी आली आणि पुढे टॅरोट रीडर हे कसं सुरू झालं याबद्दल तिने सांगितलं आहे. ती नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
पूनम चांदोरकरने सांगितला शिक्षिका, अभिनेत्री ते टॅरो कार्ड रीडरपर्यंतचा प्रवास
टॅरो कार्ड रीडर म्हणून काम करायला कधी सुरूवात केली आणि हे कसं सुरू झालं याबद्दल विचारल्यानंतर पूनम म्हणाली, “खरं तर आवड म्हणून मी हे केलेलं नाहीये. माझ्या आयुष्यात साडेतीन वर्षांपूर्वी खूप मोठं वादळ आलं होतं. मला काही गोष्टी सेटवर किंवा कुठेही सांगायला आवडत नाही. त्यावेळी मी रेकी हिलिंग घेतली आणि मला बरं वाटलं. त्यानंतर मी स्वत:च टॅरो रिडिंग केली. मला त्यातून मार्ग मिळाला. माझं असं मानणं आहे की काही गोष्टी निसर्ग तुमच्या पुढे आणून ठेवतो फक्त तुम्हाला ते नीट पाहण्याची गरज असते. त्यावेळी मी खूप खचले होते. पण, थोडा संघर्ष करून मी त्यातून बाहेर पडले.”
पूनम पुढे तो कठीण प्रसंग सांगत म्हणाली, “अनेक वर्षे माझ्या मनात जे प्रश्न होते, जी गाठ होती. आपण खूप गोष्टी मनात साठवून ठेवलेल्या असतात. त्याचा आपल्या नात्यावर खूप परिणाम होतो. मला असं वाटतं की मला आधी माहीत असलं असतं तर मी ते प्रश्न आधीच सोडवले असते. पण, मला असं वाटलं की मग यामधून दुसऱ्यांना मदत करुयात. म्हणून मी हे सुरू केलं”
पूनम पुढे म्हणाली, “तेव्हा मलासुद्धा मी एम.ए बीएड आहे. मी शिक्षिका होते. त्यामुळे हे अंधश्रद्धा तर सांगत नाहीये ना असं वाटलं म्हणून मी सगळ्यांना आधी याबद्दल सांगितलं नव्हतं. पण, जेव्हा मी काही लोकांवर हे केलं आणि त्यांच्याकडून प्रतिसाद आला तेव्हा माझ्या काही जवळच्या लोकांनी सांगितलं की हे तू जर कोणाला सांगितलं नाही तर त्यांना कळणार कसं? पण हा काही माझा व्यवसाय नाहीये. अभिनयच माझ्या कमाईचं साधन आहे.”
पूनमला पुढे तुला लहानपणापासून अभिनेत्री व्हायचं होतं का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “नाही. मी फार सामान्य कुटुंबातून आहे. माझे वडील पोलिस अधिकारी होते. घरात खूप कडक शिस्तीचं वातावरण होतं. कॉलेज झाल्यानंतर बी एडला नंबर लागल्यानंतर शिक्षिका या आयडियल श्रेत्रात काम केलं. त्यानंतर एम ए पूर्ण केलं. मी आठ वर्षे रिलायन्समध्ये अॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये मीडिया मॅनेजर म्हणून नोकरी केली आहे. त्याआधी सुरुवातीला दोन वर्षे शिक्षिका म्हणून कॉलेजमध्ये शिकवलं आहे.”
पूनम पुढे म्हणाली, “मला नाटकाची आवड होती. ताडदेवमध्ये खूप मोठा पोलिस कॅम्प मेळावा असायचा. तिथे चांगले पैसे मिळायचे. तेव्हा पैसे मिळाले की आनंद व्हायचा त्यामुळे आपण कमवत आहोत याचा आनंद व्हायचा. त्यानंतर मी त्यातच पुढे गेले. मग लग्न झालं. मग चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली आणि तीच करण्याचा निर्णय घेतला. पण, घरी येण्यची वेळ ठरलेली नसायची. मग ७-८ वर्षे काम केल्यानंतर मी ठरवलं की हे किती वर्षे करायचंय मग मला माझं काहीतरी करायचं आहे. तेव्हा दूरदर्शनमध्ये निवेदनाच्या जागा निघाल्या होत्या. मी सहज अर्ज भरुन पाहिला. तेव्हा मला तिथे बोलावण्यात आलं माझी निवड झाली. मग मी नोकरी करता करता आठवड्यातून एक दिवस यासाठी द्यायचे.”
अभिनय क्षेत्राबद्दल पूनम म्हणाली, “तेव्हा माझ्या अशाच ओळखी झाल्या मग मी ऑडिशन द्यायला सुरू केलं. मी त्यावेळी पहिल्यांदाच अंधेरी, आराम नगर इकडे गेले. पण, मला खूप भीती वाटायची सुरुवातीला याबद्दल फार काही माहीत नव्हतं. पण, ऑडिशन द्यायला लागले आणि एक जाहिरात मिळाली. त्यानंतर मला एकातून दुसरी अशा जाहिराती मिळत गेल्या. विद्या बालन, महेंद्सिंग धोनी यांच्याबरोबर जाहिरातीमध्ये काम केलं. जॉनी लिव्ह सरांबरोबर, रवी किशन यांच्याबरोबर जाहिरात केली.”
मालिकाविश्वातली करिअरबद्दल पूनम म्हणाली, “आई कुठे काय करतेमुळे मला मालिका काय असतं हे कळलं. मला आधी संजनाच्या पात्रासाठी ऑडिशन द्यायला सांगितलेली. मग मला फोन आला की मिटिंगला या. मग सगळं ठरलं तोवर मला विश्वास बसत नव्हता की खरंच मी मालिका करत आहे. आई कुठे काय करते मालिकेने इतिहास रचला. मला विशाखा या भूमिकेने ओळख दिली. कुठेही गेले तरी मला याच नावाने बोलावलं जातं.”
