मराठी मनोरंजनविश्वात अशी बरीच कलाकार मंडळी आहेत, ज्यांचं एकमेकांशी खास नातं आहे. फक्त नवरा-बायको नाही तर भाऊ-बहीण, नणंद-भावजय, बापलेक, सख्ख्या बहिणी अशी बरीच नाती आपल्याला कलाविश्वात पाहायला मिळतात. सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणाऱ्या अशाच एका सख्ख्या बहिणींच्या जोडीबद्दल आज आपण जाणून घेऊयात…
मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या अभिनेत्री आणि सख्ख्या बहिणी म्हणजे पल्लवी वैद्य आणि पूर्णिमा तळवळकर. या दोघी सध्या झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
पूर्णिमा तळवलकर ‘तुला जपणार आहे’ मालिकेत नर्मदा रामपुरे ही भूमिका साकारत आहेत. रक्षाबंधन सणाविषयी सांगताना त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्या म्हणाल्या, “बालपणी रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही सगळी चुलत भावंडं एकत्र यायचो. मी तेव्हा कथ्थक शिकत होते आणि माझी बहीण पल्लवी वैद्य हिलाही नृत्याची खूप आवड होती. ती माधुरी दीक्षितची गाणी आणि डान्स पाहून स्वतःच नृत्य शिकली. आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी एखाद्या गाण्यावर नृत्य बसवून घरच्यांसमोर सादर करायचो. हे आम्ही दरवर्षी करायचो आणि खूप एन्जॉय करायचो. माझ्या वडिलांची प्रिंटिंग प्रेस होती. तिथे आम्ही कटिंग पेपरमध्ये खेळायचो, नाचायचो आणि लपाछपीही खेळायचो. सुट्टीचा दिवस कसा संपायचा, हे आम्हाला कळायचंच नाही. माझे काही चुलत भाऊ तळेगावला राहायचे, त्यामुळे रक्षाबंधनाच्यावेळी आम्ही त्यांना पोस्टाने राखी पाठवायचो आणि त्यांच्याकडून पत्र यायचं. त्या काळात व्हिडिओ कॉलची सुविधा नव्हती, त्यामुळे पत्राची एक वेगळीच मजा होती. लहानपणी भावंडांमध्ये मस्ती, मारामारी आणि भांडणं होतात. पण आम्ही सगळे मोठे झाल्यावर आमच्यात खूप बदल झाला. आज आम्ही तिघंही एकमेकांशी प्रत्येक गोष्ट शेअर करतो. कुठल्याही अडचणीच्या वेळी मदतीचा हात देतो. ‘आपली हक्काची दोन माणसं आहेत’ ही भावना खूप समाधान देणारी आहे. रक्षाबंधनाचं हे नातं आम्ही शेवटपर्यंत असंच जपणार आहोत.”
काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत पूर्णिमा म्हणाल्या होत्या, “मी आणि माझा भाऊ आम्हा दोघांना पल्लवी खूप त्रास द्यायची. तिची नखं लहान होती…त्यामुळे ती आम्हाला बोचकारायची. त्यात मी आणि भाऊ दोघे जरा गोरे आणि आमचे डोळेसुद्धा घारे होते. याचा पल्लवीला त्रास व्हायचा. पाहुणे मंडळी यायची तर तेव्हा तेही आमच्याबद्दल तिला चिडवायचे. यामुळे तिला आमचा राग यायचा.”
पल्लवी वैद्य आणि पूर्णिमा तळवळकर या सख्ख्या बहिणी आहेत. सध्या पल्लवी ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत रेणुका ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. या दोन्ही बहिणींनी आजवर असंख्य लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
