Purnima Talwalkar Talks About Ajay Devgan & Kajol : पूर्णिमा तळवलकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या ‘झी मराठी’वरील ‘तुला जपणार आहे’ मालिकेत काम करत आहेत. त्यांना याच वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील भूमिकेसाठी आजही अनेक जण ओळखतात.
पूर्णिमा यांनी हिंदी मालिकांमध्ये व चित्रपटांतही काम केलं आहे. अशातच त्यांनी नुकतीच टेली गप्पाला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या करिअरबद्दल, लग्नानंतर ब्रेक घेण्याबद्दल आणि हिंदी चित्रपटात काम करण्याबद्दल सांगितलं आहे. पूर्णिमा यांनी बॉलीवूड अभिनेत्री काजोल व अजय देवगण यांच्याबरोबर चित्रपटात काम केलेलं आहे.
पूर्णिमा तळवलकर यांची प्रतिक्रिया
मुलाखतीत त्यांना पुन्हा हिंदीत काम का केलं नाही असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “मला मराठीत काम करायला आवडू लागलं आणि मराठीत वेगळे वातावरण आहे, तिकडे वेगळं आहे.” अजय देवगण व काजोलबद्दल विचारल्यानंतर त्या पुढे म्हणाल्या, “७ दिवस आम्ही शूट करत होतो. मेहबूब स्टुडिओमध्ये शूटिंग सुरू होतं; त्याच कपड्यांवर आम्ही इतके दिवस शूट केलं आणि आम्हाला खूप कंटाळा आला होता. मी आयुष्यात पहिल्यांदाच चित्रपटात काम करत होते.”
पूर्णिमा पुढे म्हणाल्या, “तिथे ओळख असेल तरच बोलतात आणि तेव्हा मी लहान होते, २०-२२ वर्षांची होते. तेव्हा व्हॅनिटी असायची, प्रत्येकाला वेगळी व्हॅनिटी व्हॅन असायची, त्यामुळे कोणाशी काही बोलणं व्हायचं नाही. पोटात गोळा येणं, भीती, मला जमेल की नाही; समोरच्यांना ओळखत नसल्याने असं व्हायचं माझं.”
पूर्णिमा तळवलकर यांनी अजय व काजोलबरोबर ‘प्यार तो होना ही था’ चित्रपटात काम केलं. त्यामध्ये त्यांनी अजय देवगणच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यावेळी अजय देवगणबरोबर ओळख झाली, काही आठवणी आहेत का असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “अजिबातच नाही, शॉट झाला की सगळे त्यांच्या त्यांच्या व्हॅनिटीमध्ये जायचे. तरी आम्ही चंदीगडला शूटिंगसाठी गेलो. ११ दिवस तिथे शूटिंग होतं; तेव्हा काजोल आणि बाकी लोक तर वेगळेच बसायचे, पण बाकी जे छोट्या मोठ्या भूमिका साकारणारे आम्ही कलाकार होतो ते एकत्र बसायचो, रिमा मावशीसुद्धा होत्या. आम्ही सगळे गप्पा मारायचो, आमचं छान कुटुंबासारखं बाँडिंग होतं.”
