Purva Gokhale on Veen Doghantali Hi Tutena: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकांत आहेत. सुबोध भावेने या मालिकेत समर ही भूमिका साकारली आहे, तर तेजश्री प्रधानने या मालिकेत स्वानंदी ही भूमिका साकारली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे स्वानंदी व समर या दोघांनीही त्यांच्या भावंडांच्या सुखासाठी एकमेकांशी लग्न केले आहे. सुरुवातीला त्यांच्या नात्यात अनेक गैरसमज असल्याचे पाहायला मिळत होते. त्यांच्यात सतत भांडणे व्हायची, पण त्यानंतर हळहळू त्यांच्यात मैत्री झाली. त्यांच्यातील गैरसमज कमी झाले आणि एकमेकांवरील विश्वास वाढल्याचे पाहायला मिळाले. एकमेकांना काय वाटते या गोष्टींचीदेखील ते काळजी घेऊ लागले. आता त्यांची मैत्री गाढ होत असताना समरच्या एक्स गर्लफ्रेंडची किमयाची त्यांच्या आयुष्यात एन्ट्री झाली आहे.
किमया समरच्या आयुष्यात आल्यानंतर काय बदल होणार, समर व स्वानंदीच्या नात्यात काय बदल होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
“वेगळा समर…”
किमया ही भूमिका अभिनेत्री पूर्वा गोखलेने साकारली आहे. नुकतीच पूर्वा गोखले आणि सुबोध भावे यांनी अल्ट्रा मराठी बझला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की किमया मालिकेत आली आहे. तर ती स्वानंदीला धडा देऊन जाणार आहे, शिकवून जाणार आहे की समरला धडा शिकवून जाणार आहे? यावर पूर्वा गोखले म्हणाली, “किमया आली आहे तर ती काहीतरी नक्की करून जाईल. काहीतरी किमया करून जाईल. स्वानंदीला काहीतरी शिकवून जाईन. कदाचित वेगळा समर दिसेल, सॅमला थोडीशी बदलून जाईल; तर माहिती नाही त्यासाठी तुम्हाला मालिका पाहावी लागेल.”
तर सुबोध भावे म्हणाला की, किमयाच्या येण्याने किमया घडणार आहे. बरंच काही घडणार आहे, त्यामुळेच तिची एन्ट्री झाली आहे.
पूर्वा गोखले व सुबोध भावे यांनी याआधी ‘कुलवधू’ मालिकेत एकत्र काम केले आहे. १७ वर्षांनी ते पुन्हा झी मराठी वाहिनीवरील मालिकेत स्क्रीन शेअर करत आहेत. कुलवधूनंतर त्यांनी ‘भयभीत’ नावाच्या सिनेमात काम केले आहे.
“मराठी मालिकेत मी खूप वर्षांनी…”
इतक्या वर्षांनी मराठी मालिकेत काम करण्याबद्दल पूर्वा गोखले म्हणाली, “मराठी मालिकेत मी खूप वर्षांनी काम करत आहे, कारण कुलवधूनंतर एक-दोन अशाच पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. मग मी प्रामुख्याने हिंदी मालिकांमध्ये काम करत होते. डेली सोपच्या रूटिनमुळे एका वेळी एकाच शोमध्ये काम करता येतं. इतकी वर्षे हिंदीत काम सुरू होतं, आता या भूमिकेसाठी मला अचानक विचारलं आणि मला वेळ होता, तर म्हटलं की काम करूया”, असे म्हणत इतकी वर्षे ती झी मराठी किंवा मराठी मालिकांमध्ये का दिसली नाही याबद्दल तिने सांगितले.
दरम्यान, आता ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत नेमकं काय घडणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
