Purva Kaushik and Prasad Jawade: अभिनेत्री पूर्वा कौशिक व अभिनेता प्रसाद जवादे हे नुकतेच दीप-ज्योती या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पूर्वाने मालिकेत ज्योती ही भूमिका साकारली आहे. तर प्रसादने दीप ही भूमिका साकारली आहे.

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत दाखविल्याप्रमाणे, एका अपघाताने दीप व ज्योती या दोघांच्या कुटुंबाचे आयुष्य बदलते. दीप हा श्रीमंत कुटुंबातीलआहे. पण, त्याच्या वडिलांचा त्याच्यावर विश्वास नाही.

दीपच्या भावाकडून एक अपघात होतो. त्याची गाडी ज्या रिक्षाला धडक देते, त्यामध्ये ज्योतीचा भाऊ व तिच्या बहिणीचा प्रितीचा होणारा नवरा असतो. या अपघातात त्या दोघांचाही मृत्यू होतो. सर्वांना वाटते की हा अपघात दीपकडून झाला आहे. दीपसुद्धा भावाचा गुन्हा स्वत:वर घेतो. या अपघातानंतर, भावाच्या निधनानंतर ज्योती घराची जबाबादारी सांभाळताना दिसत आहे. तर तिची बहीण प्रिती सूड घेण्यासाठी दीपच्या भावाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेते.

या सगळ्यामुळे मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसत आहे. आता या सगळ्यात या सगळ्यांची आयुष्ये कशी वळण घेणार, नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. सध्या मालिकेत दीप व ज्योती यांच्यात कुरबुरी पाहायला मिळत आहेत. मात्र, खऱ्या आयुष्यात ते एकमेकांशी कसे वागतात, त्यांच्या कोणत्या गोष्टी एकमेकांना आवडतात, याबद्दल कलाकारांनी एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.

“पाठीमागून बोलणारे डोक्याला…”

पूर्वा कौशिक व प्रसाद जवादेने नुकताच तारांगणशी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारण्यात आले की तुम्हाला एकमेकांची कोणती गोष्ट आवडते? त्यावर प्रसाद म्हणाला, “प्रामाणिक आहे. खरं बोलते. जे काही आहे ते ती तोंडावर बोलते, ते मला आवडतं. पाठीमागून बोलणारे डोक्याला त्रास असतात.”

पूर्वा म्हणाली, “तो स्वत:ही तसाच आहे. त्याच्या मनात जे येतं ते उत्स्फुर्त येतं. तो तिथल्या तिथे ते सांगतो. आपण तरी विचार करतो की हे आता बोललं पाहिजे की नाही. त्याचा स्वभाव मला आवडतो. आपल्याकडे थोडी खेळकर वृत्ती असावी आणि त्याच्याकडे ती आहे. ती छान वाटते”, असे म्हणत कलाकारांनी त्यांना एकमेकांमधील कोणती गोष्ट आवडते हे सांगितले.

पूर्वा कौशिक याआधी झी मराठी वाहिनीवरील शिवा मालिकेत प्रमुख दिसली होती. या मालिकेतील तिची शिवा ही हटके भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. तिच्या शिवा या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते. आता तिची ज्योती ही भूमिका शिवा पेक्षा वेगळी असल्याचे पाहायला मिळत आहे.

याबरोबरच, प्रसाद जवादे हा पारू या मालिकेत दिसला होता. त्याने या मालिकेत आदित्य ही भूमिका साकारली होती. प्रेमळ, आईचा लाडका, पारूवर प्रचंड प्रेम असणारा, भावासाठी कायम खंबीरपणे उभा असणारा, वडिलांचा आदर करणारा आणि कुटुंबासाठी काहीही करायला तयार असणारा आदित्य प्रेक्षकांचा लाडका होता. काही दिवसांपूर्वीच पारू मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

दरम्यान, आता दीप-ज्योती मालिकेत पुढे काय ट्विस्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.