‘बिग बॉस मराठी’चा विजेता सूरज चव्हाण २९ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकला. त्यांच्या विवाहसोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. सूरजचं लग्न सासवड येथे थाटामाटात पार पडलं. सूरज-संजना यांचं लव्हमॅरेज असून ‘गुलगीत किंग’ची पत्नी त्याच्या चुलतमामांची मुलगी आहे. या दोघांच्या लग्नाला अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उपस्थित होते. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सूरजची सहस्पर्धक जान्हवी किल्लेकर सुद्धा लाडक्या भावाच्या लग्नाला आवर्जून उपस्थित राहिली होती.
सूरजच्या लग्नात जान्हवीने प्रचंड एन्जॉय केलं. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्री लाडक्या भावाच्या लग्नासाठी आदल्या दिवशीच त्याच्या मोढवे गावी गेली होती. मेहंदी, हळद, साखरपुडा, लग्नाची वरात या सगळ्या विधींमध्ये जान्हवी मोठ्या आवडीने सहभागी झाली होती. सूरज चव्हाणची वरात आलिशान गाड्यांमधून निघाली होती. यावेळी सूरज-जान्हवीने जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं. याचे फोटो अन् व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून चाहते जान्हवीचं भरभरून कौतुक करत आहेत.
जान्हवीने लग्नाच्या प्रत्येक कार्यात सूरजला साथ दिली. विवाहसोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यावरही जान्हवीने सूरजच्या सगळ्या चाहत्यांना पुढाकार घेऊन गोंधळ, गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. यामुळे सूरजच्या लग्नात सर्वाधिक चर्चा झाली ती जान्हवी किल्लेकरची.
जान्हवी अभिनेता पुष्कर जोगची सुद्धा चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे जान्हवीचे सूरजच्या लग्नातील व्हायरल होणारे फोटो शेअर करत पुष्कर मिश्किलपणे लिहितो, “मुंबईमधल्या प्रदूषणाची हवा एक तरफ आणि सूरजच्या लग्नात जान्हवीची हवा एक तरफ…मला नंतर कळलं की सूरजचं लग्न आहे. सूरज तुला खूप-खूप शुभेच्छा! जान्हवी आता मलाही गिफ्ट हवं आहे…”
जान्हवीने सूरजला लग्नात अंगठी गिफ्ट दिलीये. यामुळे पुष्करने त्याच्या पोस्टमध्ये मलाही गिफ्ट हवं आहे असं म्हटलं आहे. अभिनेत्याची ही पोस्ट रिशेअर करत जान्हवी म्हणते, “#जोगबोलणार तरी म्हटलं अजून जोग बोलले कसे नाहीत..बोला सर तुम्हाला काय गिफ्ट हवं?”

दरम्यान, जान्हवीने पुष्करला ‘ह्युमन कोकेन’ या त्याच्या आगामी सिनेमासाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
